धावपटू जैशाचे आरोप बिनबुडाचे !
By admin | Published: August 24, 2016 04:05 AM2016-08-24T04:05:21+5:302016-08-24T04:05:21+5:30
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची धावपटू ओ.पी. जैशाने स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरण असताना अधिकाऱ्यांनी पाणी व एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नसल्याचे आरोप केले होते. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
सर्व देशांचे दोन किलोमीटर अंतरावर स्टॉल होते, पण आपल्या देशाचा स्टॉल रिकामा होता.’ जैशा मॅराथॉन पूर्ण केल्यानंतर फिनिश लाईनवर कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव्ह यांचा एका डॉक्टरसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांना १२ तासांसाठी पोलीस ठाण्यात राहावे लागले. एएफआयने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘प्रत्येक संघाला आपले वैयक्तिक ड्रिंक बुथवर ठेवण्याची परवानगी असते. त्यावर संघ आणि खेळाडूच्या पसंतीचे मार्क असते. या नियमानुसार मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ व्यवस्थापक १६ बॉटल्स (जैशा व कवितासाठी प्रत्येकी ८) घेऊन प्रशिक्षक निकोलेई स्नेसारेव्ह यांच्याकडे त्यांच्या रुममध्ये गेले होते. संघव्यवस्थापकाने त्यांना एनर्जी ड्रिंक्सबाबत आवड कळविण्यास सांगितले होते. त्यामुळे खेळाडूंच्या गरजेनुसार त्यावर मार्क लावून बुथवर ठेवण्यासाठी आयोजकांना देता आले असते.’ एएफआयच्या मते, या प्रकरणात दोन्ही खेळाडूंनी (जैशा व कविता) प्रस्ताव फेटाळून भारतीय व्यवस्थापकला वैयक्तिक एनर्जी ड्रिंक्सची गरज नसल्याचे सांगितले. जर गरज भासली तर आयोजकांच्या बुथवरून ड्रिंक्स घेणार असल्याचे कळवले होते.’ (वृत्तसंस्था)
>जैशाने आयोजकांवर केलेले आरोप
रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणारी जैशा २ तास ४७ मिनिट १९ सेकंद वेळेसह ८९ स्थानावर राहिली. जैशा म्हणाली, ‘तेथे उष्ण वातावरण होते. स्पर्धेला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. आमच्यासाठी ना पाणी होते ना एनर्जी ड्रिंक होते. केवळ एकदा ८ किलोमीटर अंतरावर रिओ आयोजकांतर्फे मला पाणी मिळाले. त्याची काही मदत झाली नाही.
>चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन
क्रीडा मंत्रालयाने जैशाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मंगळवारी दोन सदस्यांची स्थापन केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘क्रीडा
व युवा कल्याण मंत्री विजय गोयल यांनी जैशाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समित स्थापन केली आहे. त्यात संयुक्त सचिव क्रीडा ओंकार केडिया आणि क्रीडा संचालक विवेक नारायण यांचा समावेश आहे.’ समित सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल.
>कवितानेही फेटाळले आरोप
ओ.पी. जैशाने भारतीय अधिकारी बेजबाबदार असल्याचा आरोप केला असला तरी अन्य मॅरेथॉनपटू कविता राऊतने मात्र हे आरोप फेटाळून लावल्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे. या स्पर्धेत सहभागी अन्य भारतीय धावपटू कविता राऊतने मात्र एएफआयची पाठराखण करताना जैशाचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कविताने म्हटले की, भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने पाणी व एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध करून दिले होते आणि त्यांच्याविरुद्ध माझी कुठली तक्रार नाही. महासंघाने मॅरेथॉनदरम्यान मला ड्रिंक्स उपलब्ध करून दिले होते, पण मीच नकार दिला. मी केवळ माझ्याबाबत सांगत आहे. कारण मला धावताना सहद किंवा ग्लुकोज घेण्याची सवय नाही.’
>नियमानुसार जर एखादा खेळाडू बाहेरच्या व्यक्तीकडून एनर्जी ड्रिंक्स घेत असेल तर त्याला अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्स पुरविले नाहीत, हा ओ.पी. जैशाने केलेला आरोप चुकीचा आहे. - एएफआय