जसप्रीत बुमराहची द्वितीय स्थानी झेप
By Admin | Published: June 28, 2017 12:47 AM2017-06-28T00:47:46+5:302017-06-28T00:47:46+5:30
डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवताना दुसरे स्थान मिळवले आहे.
दुबई : डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवताना दुसरे स्थान मिळवले आहे. त्याचवेळी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच, अव्वल तीन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून बांगलादेशचा शाकिब अल हसन अग्रस्थानी आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज इमाद वसीम याने टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने आपले अव्वल स्थान गमावले. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला २-१ असे नमविल्यानंतर एक दिवसाने नवी टी२० क्रमवारी जाहीर झाली. ताहिरला दोन सामन्यांतून केवळ एकच बळी घेण्यात यश आले.
ताहिरची तिसऱ्या स्थानी घसरण झाल्यानंतर त्याचा फायदा इमादला झाला आणि त्याने अव्वल स्थानी झेप घेतली.
तसेच बुमराहनेही आगेकूच करताना दुसऱ्या स्थानी कब्जा केला. फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये कोहली, आॅस्टे्रलियाचा अॅरोन फिंच आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांनी आपआपले अव्वल तीन स्थान कायम राखले आहे. (वृत्तसंस्था)