जैशाने मोडला १९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम
By admin | Published: January 19, 2015 06:11 AM2015-01-19T06:11:02+5:302015-01-19T06:11:02+5:30
आशियाई स्पर्धेतील १,५०० मीटर व ५,००० मीटर स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय धावपटू ओ़ पी़ जैशा हिने मुंबई मॅरेथॉनमधील पदार्पण अविस्मरणीय
मुंबई : आशियाई स्पर्धेतील १,५०० मीटर व ५,००० मीटर स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय धावपटू ओ़ पी़ जैशा हिने मुंबई मॅरेथॉनमधील पदार्पण अविस्मरणीय बनविला. तिने २ तास ३७ मिनिटे व २९ सेकंदांची वेळ नोंदवून वॅली सत्यभामा यांच्या १९ वर्षांपूर्वीच्या २ तास ३९ मिनिटे आणि १० सेकंदांच्या विक्रमाला मागे टाकले. या विक्रमाबरोबरच जैशाने भारतीय महिला गटाचे जेतेपद पटकावले आणि बीजिंगमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीटही मिळवले.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेकरिता अॅथलेटिक फेडरेशन आॅफ इंडियाकडून (एएफआय) देण्यात आलेल्या २ तास ४४ मिनिटांच्या वेळेपूर्वीच जैशाने मॅरेथॉन पूर्ण केली. त्यापाठोपाठ गतविजेत्या ललिता बाबरने (९वे) २ तास ३८ मिनिटे व २१ सेकंदांची, तर सुधा सिंगने (११ वे) २ तास ४२ मिनिटे व १२ सेकंदांची नोंद करीत भारतीय महिला गटात अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीच्या बळावर या दोघींनीही विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
जैशा व ललिता या दोघींना प्रशिक्षक डॉक्टर निकोलाई स्नेसारेव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ५,००० मीटर व मॅरेथॉन यापैकी कोणत्या प्रकारात खेळणार असल्याचे जैशाला विचारले असता ती म्हणाली, मी आताच सांगू शकत नाही. प्रशिक्षक जे ठरवितील त्या प्रकारात मी खेळेन. जैशा बीजिंगमध्ये ५,००० मीटर व १०,००० मीटर स्पर्धेत खेळू शकते, तर ललिता ५,००० मीटर व ३,००० मीटर स्टीपलचेस प्रकारात खेळेल, अशी माहिती स्नेसारेव यांनी दिली.
दुसरीकडे मात्र भारतीय पुरुषांना विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यात अपयश आले. पुरुष गटात अव्वल आलेल्या करण सिंगने २ तास २१ मिनिटे ३५ सेकंदांची वेळ नोंदवली. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अर्जुन प्रधान व बहादूर सिंग धोनी यांनी अनुक्रमे २ तास २२ मिनिटे व २२ सेकंदांची व २ तास २२ मिनिटे ४१ सेकंदांची वेळ नोंदवली. (क्रीडा प्रतिनिधी)