जेरेमी लालरिनुंगाने रचला युवा विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:47 AM2019-04-22T03:47:41+5:302019-04-22T03:47:51+5:30
युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरीसह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले.
निंगबो : माजी विश्वचॅम्पियन मीराबाई चानूने आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली, पण तरीही थोड्या फरकाने तिला कांस्यपदकापासून वंचित रहावे लागले. दुसरीकडे युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरीसह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले.
जेरेमीने ‘ब’ गटात ६७ किलोमध्ये स्नॅचमध्ये युवा विश्व व आशियाई विक्रम मोडला. त्याने तीनपैकी दोन प्रयत्नांमध्ये १३० व १३४ किलो वजन पेलले. त्याने यंदा १३१ किलो वजन पेलले होते. जेरेमीने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये आपल्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत दुप्पट वजन दोन यशस्वी प्रयत्नांमध्ये (१५७ व १६३ किलो) पेलले. त्याने कजाखस्तानच्या साईखान तेइसुयेवचा १६१ किलोचा विक्रम मोडला.
जेरेमीने एकूण २९७ किलो वजन उचलले. तो पाकिस्तानच्या ताल्हा तालिबच्या तुलनेत पिछाडीवर राहिला. त्याने ३०४ किलो वजन पेलले. ही स्पर्धा आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे. त्यातील गुणांची टोकियो आॅलिम्पिक २०२० च्या अखेरच्या रँकिंगमध्ये दखल घेण्यात येईल.
मीराबाईने ४९ किलो गटात आपली सर्वोत्तम कामगिरी केली, पण ती कांस्यपासून थोडक्यात वंचित राहिली. तिने स्नॅचमध्ये ८६ किलो वजन उचलले व क्लीन अॅण्ड जर्कमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना ११३ किलो वजन पेलले. तिने एकूण १९९ किलो वजन उचलले. यापूर्वी चानूची सर्वोत्तम कामगिरी १९२ किलो होती. चीनच्या झांग रोंगनेही १९९ किलो वजन पेलले. पण नव्या नियमानुसार ती कांस्यची मानकरी ठरली. या नियमानुसार क्लीन अॅण्ड जर्कमध्ये कमी वजन उचलणाऱ्या खेळाडूला एकूण वजन गटात वरचे स्थान मिळते. चीनच्या होऊ झिहुईने सुवर्ण, तर उत्तर कोरियाच्या रि सोंग गमने रौप्यपदक पटकावले.
आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघातर्फे गेल्या वर्षी
वजनगटात बदल करण्यात आल्यानंतर मीराबाईची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ती यापूर्वी ४८ किलो वजनगटात सहभागी होत होती. तिने थायलंड एजीएटी कपमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते.