ज्यु. हॉकी विश्वचषकाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: November 7, 2016 12:04 AM2016-11-07T00:04:30+5:302016-11-07T00:04:30+5:30
पुढील महिन्यात ८ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
लखनौ : पुढील महिन्यात ८ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
आशिया चॅम्पियन भारतीय संघ येथे २२ नोव्हेंबरला पोहोचणार आहे. येथील एका क्रीडा महाविद्यालयात संघ सराव करणार आहे. त्यानंतर भारत ‘अ’ व भारत ‘ब’ दरम्यान एक प्रदर्शनीय सामना होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह अन्य चार संघ ४ डिसेंबरला पोहोचणार आहेत. गतविजेता जर्मनीही ४ डिसेंबरला पोहोचणार असून, त्यांचा पहिल्याच दिवशी स्पेनशी सामना होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे सर्व १६ संघ पाच डिसेंबरपर्यंत येथे पोहोचणार आहेत. विश्वचषक स्पर्धेचे प्रायोजक उत्तर प्रदेश सरकार ध्यानचंद स्टेडियममध्ये गुरूगोविंदसिंग अॅस्ट्रोटर्फचे काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण करणार आहेत. अकरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सुमारे ५०० खेळाडू, अधिकारी व सहयोगी कर्मचाऱ्यांसाठी सर्व हॉटेल बुक करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत भारतासह आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना, आॅस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, जपान, कोरिया, हॉलंड, इजिप्त, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका
व स्पेनच सहभागी आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सुमारे १०० हून अधिक देशांत करण्यात येणार आहे.
स्पर्धेत भारताच्या गटात
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व कॅनडाचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)
स्पर्धेतील
भारताचे सामने असे
भारत- कॅनडा : ८ डिसेंबर
भारत- इंग्लंड : १० डिसेंबर
भारत-द. आफ्रिका : १२ डिसेंबर
उपांत्य व अंतिम सामना
१८ डिसेंबर
क्रीडामंत्र्यांकडून
हॉकी संघाचे अभिनंदन
नवी दिल्ली : सिंगापूर येथे आशियाई स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी अभिनंदन केले आहे.
गोयल यांनी संघाचे कौतुक करताना म्हटले आहे, ‘नुकतेच पुरुषांच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करीत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर महिला संघाचा विजय साजरा करण्याची वेळ आली आहे. दोन्ही संघांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशामागे कठोर परिश्रम व शिस्त आहे.’ यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही महिला संघाचे अभिनंदन केले आहे.