ज्यू. महिला फुटबॉल : महाराष्ट्राची दणदणीत विजयी सलामी
By admin | Published: July 4, 2016 09:35 PM2016-07-04T21:35:38+5:302016-07-04T21:35:38+5:30
भाग्यश्री दळवीने झळकावलेल्या धमाकेदार ५ गोलच्या जोरावर महाराष्ट्राने दणदणीत विजयी सलामी देताना आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत छत्तीसगडचा ८-० असा फडशा पाडला
ज्यू. महिला फुटबॉल : भाग्यश्रीने नोंदवले ५ गोल; छत्तीसगडचा ८-० ने उडवला धुव्वा
मुंबई : भाग्यश्री दळवीने झळकावलेल्या धमाकेदार ५ गोलच्या जोरावर महाराष्ट्राने दणदणीत विजयी सलामी देताना आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत छत्तीसगडचा ८-० असा फडशा पाडला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने तुफान हल्ला चढवताना छत्तीसगडच्या आव्हानातली हवाच काढली.
कटक (ओडिसा) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भाग्यश्रीने कमालीचा आक्रमक खेळ करताना महाराष्ट्राकडून निर्णयाक खेळ केला. तीने ५ गोल झळकावताना अन्य तीन गोलमध्ये निर्णायक भूमिका बजावताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला. भारताची माजी ज्युनियर कर्णधार करेन पैस हिने देखील २ गोल करताना महाराष्ट्राच्या विजयात योगदान दिले. तर ट्रीसिया कोलॅकोने एक गोल नोंदवला.
सावध सुरुवात केलेल्या महाराष्ट्राने हळूहळू आक्रमक पवित्रा घेत छत्तीसगडला दबावाखाली आणले. भाग्यश्रीने पहिला गोल करुन महाराष्ट्राचे खाते उघडल्यानंतर ४२व्या मिनिटाला करेनने गोल करुन मध्यंतराला महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. विश्रांतीनंतर मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जबरदस्त आक्रमण करताना छत्तीसगडच्या क्षेत्रात जोरदार हल्ले केले. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने ६ गोलचा धडाका केल्यानंतर छत्तीसगडने पराभव टाळण्याचे प्रयत्नही सोडले.