गुजरातविरुद्ध झारखंड अडचणीत; किशनने सावरले
By Admin | Published: January 3, 2017 12:38 AM2017-01-03T00:38:27+5:302017-01-03T00:38:27+5:30
प्रियांक पांचलच्या शतकी खेळीनंतर वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गुजरातने झारखंडविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी वर्चस्व कायम राखले.
नागपूर : प्रियांक पांचलच्या शतकी खेळीनंतर वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गुजरातने झारखंडविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी वर्चस्व कायम राखले. कालच्या ३ बाद २८३ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या गुजरात संघाने पहिल्या डावात ३९० धावांची मजल मारली.
वैयक्तिक १४४ धावसंख्येवरून पुढे खेळताना पांचल पाच धावांची भर घालत तंबूत परतला. त्याला अजय यादवने बाद केले. त्याने २६७ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार लगावले. तळाच्या फळीतील आर. पी. सिंगने फलंदाजीमध्ये उल्लेखनीय योगदान देताना ६९ चेंडूंना सामोरे जात ५ चौकार व १ षट्काराच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. यादव व शुक्ला यांनी अनुक्रमे ६७ व ७१ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले, तर विकास सिंगने ५९ धावांत २ फलंदाजांना माघारी परतवले. शाहबाज नदीम व कौशल सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात खेळताना आर. पी. सिंगच्या (३-४८) अचूक माऱ्यापुढे झारखंड संघाची एकवेळ ४ बाद १२१ अशी अवस्था झाली होती. दिवसअखेर झारखंड संघाने ५ बाद २१४ धावांची मजल मारली. झारखंड संघ अद्याप १७६ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत.
आर. पी. सिंगने दोन्ही सलामीवीर प्रत्युष सिंग (२७) व सुमित कुमार (२) यांना माघारी परतवले. फॉर्मात असलेल्या ईशान किशनने (६१) ईशांक जग्गीच्या (नाबाद ४०) साथीने पाचव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.
आर. पी. सिंगने ईशानला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. ईशानने ५९ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व ३ षट्कार लगावले. सोमवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जग्गीला राहुल शुक्ला (०) खाते न उघडता साथ देत होता.
धा व फ ल क
गुजरात पहिला डाव : एस. बी. गोहेल झे. विराट सिंग गो. विकाश सिंग १८, पी. के. पांचल झे. कौशल सिंग गो. यादव १४९, बी. एच. मेराई झे. ईशान किशन गो. विकाश सिंग ३९, पार्थिव पटेल पायचित गो. कौशल सिंग ६२, एम. सी. जुनेजा झे. विराट सिंग गो. यादव २२, आर. एच. भट्ट पायचित गो. नदीम २३, सी. जे. गांधी झे. प्रत्युक्ष सिंग गो. यादव २०, आर. बी. कलारिया त्रि.गो. शुक्ला ०१, आर. पी. सिंग त्रि.गो. शुक्ला ४०, एच. पी. पटेल नाबाद ०४, जे. जे. बुमराह झे. ईशान किशन गो. शुक्ला ००. अवांतर (१२). एकूण १२६.२ षटकांत सर्वबाद ३९०. बाद क्रम : १-६२, २-१२७, ३-२६६, ४-२९४, ५-२९९, ६-३२३, ७-३२४, ८-३८६, ९-३८६, १०-३९०. गोलंदाजी : ए. आर. यादव २२-६-६७-३, विकाश सिंग १९-६-५९-२, आर. शुक्ला २६.२-७-७१-३, एस. नदीम ३५-३-१०६-१, कौशल सिंग २०-५-६१-१, एस. एस. तिवारी ३-०-१३-०, प्रत्युक्ष सिंग १-०-३-०.
झारखंड पहिला डाव : प्रत्युक्ष सिंग झे. भट्ट गो. सिंग २७, सुमित कुमार झे. मेराई गो. सिंग ०२, विराट सिंग त्रि.गो. भट्ट ३४, एस. एस. तिवारी पायचित गो. पटेल ३९, ईशांक जग्गी खेळत आहे ४०, ईशान किशन झे. बुमराह गो. सिंग ६१, आर. शुक्ला खेळत आहे ००. अवांतर (११). एकूण ५१ षटकांत ५ बाद २१४. बाद क्रम : १-८, २-५३, ३-८९, ४-१२१, ५-२१३. गोलंदाजी : आर. पी. सिंग ९-२-४८-३, आर. बी. कलारिया ११-३-४१-०, जसप्रीत बुमराह १२-४-३८-०, आर. एच. भट्ट ६-१-३७-१, एच. पी. पटेल १३-१-४५-१.