जीतू, हीना यांना एअर पिस्तुल मिश्र सांघिक गटात सुवर्ण, दीपक-मेघना चौथ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:32 AM2017-10-25T00:32:26+5:302017-10-25T00:32:30+5:30
नवी दिल्ली : जीतू राय व हिना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्वकप फायनलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत बाजी मारली.
नवी दिल्ली : जीतू राय व हिना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्वकप फायनलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत बाजी मारली. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणा-या राय व माजी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती सिद्धू यांचे मिश्र सांघिक स्पर्धेतील हे तिसरे सुवर्ण आहे. आयएसएसएफ विश्वकपमध्ये प्रथमच अधिकृतपणे मिश्र सांघिक स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. यंदा विश्वकपमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचा समावेश करण्यात आला आहे. टोकियो आॅलिम्पिक २०२०मध्ये प्रथमच मिश्र टीम स्पर्धेचा समावेश करण्यात येणार आहे.
राय व सिद्धू यांनी पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावून अंतिम फेरी गाठली आणि त्यानंतर फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. चीनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कर्णसिंह शूटिंग रेंजवर १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताचे दीपककुमार व मेघना सज्जनार यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चुकीच्या क्रमामध्ये नेम साधल्यामुळे भारतीय जोडीला दोन शॉटच्या पेनल्टीला सामोरे जावे लागले. असे झाले नसते तर त्यांना पदक जिंकण्याची संधी होती. जीतू व हिना जोडीने अंतिम फेरीत ४८३.४ गुणांची कमाई करून अव्वल स्थान पटकावले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके पटकावणारा राय १० मीटर फ्री पिस्तुल व ५० मीटर पिस्तुल स्पर्धेतही सहभागी होणार आहे.
हिनाने विश्वकप फायनलमध्ये दुसºयांदा सुवर्णपदक पटकावले. तिने २०१३मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावले होते. जीतूचे विश्वकप फायनलमध्ये हे दुसरे पदक आहे. त्याने गेल्या वर्षी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुलमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
हिना म्हणाली, ‘‘आपल्या लोकांपुढे विजय मिळविल्यामुळे चांगले वाटते. दरम्यान, याचा आमच्यावर अतिरिक्त दबावही होता. आमच्याकडून लोकांना आशा
होती. सर्वांची नजर आमच्या कामगिरीवर होती. त्यामुळे आम्ही एकत्र सरावही केला.’’
राय म्हणाला, ‘‘स्पर्धेचा हा प्रकार मला आवडतो. अन्य स्पर्धांच्या तुलनेत याला अधिक वेळ लागतो; पण आम्हाला आवडतो.’’
मिश्र टीम ट्रॅपमध्ये स्पेनच्या एंटोनियो बैलोन व बिटाईस मार्टिनेजने फायनल राऊंडमध्ये ५० पैकी ४२ गुणांची कमाई करून सुवर्णपदक पटकावले. त्यांनी इटलीच्या जियोवानी पेलियो व जेसिका रोसी यांचा पराभव केला. डेन्मार्कच्या डेरेक हेल्डमॅन व अॅश्ले कॅरोल यांनी कांस्यपदक पटकावले.