जीतू रायला सुवर्ण, मेहुलीला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:00 AM2018-04-10T04:00:47+5:302018-04-10T04:27:23+5:30
भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सोमवारी सुवर्ण जिंकले.
गोल्ड कोस्ट : भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सोमवारी सुवर्ण जिंकले. युवा मेहुली घोषला महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात शूट आऊटपर्यंतच्या थरारक रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विश्व चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता रायने २३५.१ गुणांची नोंद केली. भारताचाच ओमप्रकाश मिठारवाल याला कांस्य तसेच दहा मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला हिला कांस्य मिळाले. १७ वर्षांच्या मेहुलीने १०.९ गुणांची कमाई करीत लढत शूटआऊटपर्यंत खेचली होती. त्याचवेळी सिंगापूरची प्रतिस्पर्धी मार्टिना लिंडसे व्हेलोंसो हिने १०.३ तर मेहुलीने ९.९ गुणांची नोंद करताच सिंगापूरला सुवर्ण पदक मिळाले. गत चॅम्पियन चंदेला २२५.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. चंदेलाने चार वर्षांआधी नोंदविलेला राष्टÑकुलचा स्वत:चाच पात्रता विक्रम मोडीत काढला. मेक्सिकोत आयएसएफ विश्वचषकाची सुवर्ण विजेती मेहुलीने अंतिम फेरीत सरस कामगिरी करीत आपल्याच सहकारी खेळाडूला मागे टाकले. पुरुषांच्या स्किट फायनलमध्ये समित शाह सहाव्या स्थानावर घसरला. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये मिठारलवालने पात्रता फेरीत ५८४ गुणांसह नवा विक्रम नोंदविला पण अखेरच्या आठ नेमबाजांत त्याला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.
>पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेली पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू न्यूझीलंडची भारोत्तोलनपटू लारेल हबार्डला खांद्याचे हाड सरकल्यामुळे माघार घ्यावी लागली. ४० वर्षीय लारेल हबार्डने एक दशकापूर्वी लिंग बदल करताना गेव्हिनची लारेल झाली. या स्पर्धेत तिचे टीकाकारही
कमी नव्हते आणि चाहतेही भरपूर आहेत. समोआचे भारोत्तोलन प्रशिक्षक जेरी वालवर्क म्हणाले, तिला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देणे चुकीचे होते कारण तिच्यामध्ये एका पुरुषाप्रमाणे शक्ती आहे.
हबार्ड म्हणाली, ‘मला येथे चाहत्यांकडून बरेच प्रेम मिळाले. सुरुवातीला मला भीती वाटत होती. मी आॅसी नागरिकांचे आभार मानते.’ हबार्ड ९० किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३२ चा विक्रम नोंदवण्याच्या प्रयत्नात होती, पण तिच्या खांद्याचे हाड सरकले.