जितू रायला रौप्य
By admin | Published: June 26, 2016 01:58 AM2016-06-26T01:58:59+5:302016-06-26T01:58:59+5:30
भारतीय नेमबाज जितू रायने आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत शनिवारी चमकदार कामगिरी करताना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. जितूकडून
बाकू : भारतीय नेमबाज जितू रायने आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत शनिवारी चमकदार कामगिरी करताना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. जितूकडून भारताला रिओ आॅलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे.
जितूला शुक्रवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते; पण त्याने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. थोड्या फरकाने त्याचे सुवर्णपदक हुकले. रिओ आॅलिम्पिकचा यजमान देश असलेल्या ब्राझीलच्या फेलिप अल्मिदा वूने सुवर्णपदक पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे सुवर्ण आहे. फेलिपने बँकॉकमध्ये मोसमातील पहिल्या टप्प्याच्या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. ब्राझीलच्या या २४ वर्षीय नेमबाजाने फायनलमध्ये २००.० असा स्कोअर नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर २८ वर्षीय जितूने १९९.५ गुणांसह रौप्यपदकाचा मान मिळवला. तीनदा आॅलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या कोरियाच्या जिन जोंगोहला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. जिनने ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. सध्याच्या विश्वकप स्पर्धेत भारताचे हे पहिलेच पदक आहे. भारताला चौथ्या दिवशी पदकाचे खाते उघडता आले. (वृत्तसंस्था)
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नेमबाज जितूने फायनलमध्ये अखेरच्या मालिकेत चमकदार कामगिरी करीत रौप्य पटकावले. जितूने पहिल्या मालिकेत ३०.५, दुसऱ्या मालिकेत ३०.२ चा स्कोअर नोंदवला होता. त्याने एलिमिनेशन पदक राऊंडमध्ये अखेरच्या दोन शॉटवर अनुक्रमे १०.२ व १०.६ असा शानदार स्कोअर नोंदवला. एलिमिनेशनमध्ये जितू याने १३८.८ गुणांची नोंद केली.