जेएलटीटीए संघाचे विजेतेपद
By admin | Published: June 19, 2015 02:06 AM2015-06-19T02:06:22+5:302015-06-19T02:06:22+5:30
प्रशिक्षक सुहास राणे यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेताना एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात गोमंतक एससी विरुध्द निर्णायक कामगिरी करत
मुंबई : प्रशिक्षक सुहास राणे यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेताना एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात गोमंतक एससी विरुध्द निर्णायक कामगिरी करत जेएलटीटीए ‘अ’ संघाला आंतर क्लब टेबल टेनिस लीग स्पर्धेत द्वितीय श्रेणीचे विजेतेपद जिंकून दिले. त्याचवेळी गोरेगाव एससीने सांताक्रुझ जिम ‘अ’ संघाला नमवून पुरुष गटाच्या प्रथम श्रेणीची अंतिम फेरी निश्चित केली.
मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने खार जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेच्या द्वितीय श्रेणी अंतिम सामन्यात जेएलटीटीए संघाने एकहाती वर्चस्व राखले. वरुण शेठने पहिल्या एकेरीच्या लढतीत दिनकर शेलारका याचा १२-१४, ८-११, ११-१, ११-३, ११-९ असा झुंजार पराभव करुन जेएलटीटीए संघाला आघाडीवर नेले. यानंतर सुहास राणेने देखील सरोश श्रॉफचा ११-६, ११-१, १३-११ असा धुव्वा उडवून संघाची आघाडी २-० अशी मजबूत केली.
तिसऱ्या लढतीत मात्र गोमंतकच्या राम कदमने देव श्रॉफ विरुध्द १२-१०, ५-११, ११-८, ७-११, १२-१० असा खडतर विजय मिळवताना संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली. यावेळी गोमंतक पुनरागमन करणार अशी अपेक्षा होती. परंतु, सुहास राणेने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना एकतर्फी झालेल्या एकेरी लढतीत दिनकर विरुध्द ११-६, ११-६, ११-८ असा दणदणीत विजय मिळवताना जेएलटीटीए संघाच्या विजेतेपदावर शिक्का मारला.
पुरुष प्रथम श्रेणी गटामध्ये गोरेगाव एससी संघाने सांताक्रुझ जिम ‘अ’ संघाचा ३-१ असे नमवून अंतिम फेरी गाठली. सलामीच्या लढतीत गोरेगाव संघाचा मंदार हर्डीकर अनुभवी निशाद शाह विरुध्द ७-११, १०-१२, ७-११ असा पराभूत झाल्याने सांताक्रुझने १-० अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र गोरेगाव संघाने आक्रमक खेळ करताना सांताक्रुझला पुनरागमनाची संधीच दिली नाही. पंकज कुमारने तुफानी खेळ करताना सांताक्रुझच्या कसलेल्या हर्ष मणियारचा ११-५, ११-८, ११-५ असा फडशा पाडून सामना बरोबरीत आणला.
परेश मुरेकरने अटीतटीच्या सामन्यात ॠत्विक पंडीरकरचा १२-१०, ९-११, ३-११, ११-७, १२-१० असा पाडाव करुन संघाला २-१ असे आघाडीवर नेले. पुन्हा एकदा पंकजने निर्णायक खेळ करुन निशादचा ११-५, ८-११, ११-९, १५-१३ असा पाडाव केला व गोरेगावला अंतिम फेरी गाठून दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
सुहासचा निर्णायक खेळ
गोमंतक एससी संघाच्या विजेतेपदात प्रशिक्षक सुहास राणेने दोन एकतर्फी विजयांची नोंद करताना निर्णायक खेळ केला. सुहासने सरोशचा पराभव करुन संघाला मजबूत स्थितीत आणले. यानंतर संघाची आघाडी कमी झाल्यावर पुन्हा एकदा सुहासने आपल्या अनुभवाच्या जोरावर दिनकर शेलारकाचा धुव्वा उडवून संघाचे विजेतेपद निश्चित केले.