इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुट
By admin | Published: February 14, 2017 12:10 AM2017-02-14T00:10:18+5:302017-02-14T00:10:18+5:30
इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुटची नियुक्ती करण्यात आली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) सोमवारी ही घोषणा केली.
लंडन : इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुटची नियुक्ती करण्यात आली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) सोमवारी ही घोषणा केली. यॉर्कशायरचा फलंदाज रुट यापूर्वी संघाचा उपकर्णधार होता. अॅलिस्टर कुकने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुटला या पदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. कुकने विक्रमी ५९ कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केल्यानंतर गेल्या आठवड्यात राजीनामा दिला.
कुकच्या नेतृत्वाखाली रुटने इंग्लंड संघात पदार्पण केले. रुट सध्या इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. इसीबीच्या माध्यमातून बोलताना २६ वर्षीय रुटने म्हटले की, ‘इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद मिळणे सन्मानाची बाब आहे. त्यामुळे मी उत्साहित आहे.’
रुटच्या स्थानी अष्टपैलू बेन स्टोक्सची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे इसीबीने स्पष्ट केले. इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी धावा फटकावणारा कुक कसोटी क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरू ठेवणार आहे.
रुटला कुक व्यतिरिक्त अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड आणि प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस व सहायक प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांचे सहकार्य लाभणार आहे.
इसीबीचे संचालक व माजी कर्णधार अॅण्ड्य्रू स्टॉस म्हणाले, ‘रुट कर्णधारपदासाठी सर्वांत योग्य व्यक्ती असून त्याने या पदाचा स्वीकार केल्यामुळे आनंद झाला.’ (वृत्तसंस्था)