जोको, सेरेना, फेडरर एक्स्प्रेस सुसाट

By admin | Published: January 25, 2016 02:27 AM2016-01-25T02:27:05+5:302016-01-25T02:27:05+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी लौकिकास साजेसा खेळ करीत थाटात आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

Joko, Serena, Federer Express Susate | जोको, सेरेना, फेडरर एक्स्प्रेस सुसाट

जोको, सेरेना, फेडरर एक्स्प्रेस सुसाट

Next

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी लौकिकास साजेसा खेळ करीत थाटात आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अन्य लढतीत रशियाची मारिया शारापोव्हा, जपानी खेळाडू केई निशिकोरी यांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पुरुष गटातील एकेरी लढतीत अनुभवी जोकोविचला फ्रान्सच्या जाईल्स सीमोनविरुद्धच्या लढतीत विजय मिळविण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. हा सामना तब्बल ४ तास ३२ मिनिटांपर्यंत चालला. अखेर या स्टार खेळाडूने आपल्या अनुभवाच्या जोरावर सिमोनवर ६-३, ६-७, ६-४, ४-६, ६-३ अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचला आता जपानच्या केई निशिकोरीचा सामना करावा लागणार आहे. पुरुषांच्या दुसऱ्या लढतीत रॉजर फेडररने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीनला ८८ मिनिटांत ६-२, ६-१, ६-४ असे नमवित पुढच्या फेरीत प्रवेश केला.
अन्य लढतीत निशिकोरी याने फ्रान्सच्या ज्यो विल्फ्रेड त्सोंगावर सरळ सेटमध्ये ६-३, ६-२, ६-३ असा विजय मिळवीत अंतिम आठ खेळाडूंत जागा मिळविली. दुसऱ्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या टोमास बर्डीच याने ५ सेटपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन लढतीत स्पेनच्या रॉबर्टा बतिस्तावर ४-६, ६-४, ६-३, १-६, ६-३ अशी बाजी मारली. महिला गटात विजेतेपदाची दावेदार असलेल्या सेरेना विल्यम्स हिने एकेरी सामन्यात रशियाच्या मार्गेरिटा गेस्परयानवर ६-२, ६-१ अशी सहज मात केली. पुढच्या लढतीत सेरेनाला रशियाच्या मारिया शारापोव्हाशी झुंजावे लागेल.
अन्य लढतीत अनुभवी मारिया शारापोव्हा हिने अटीतटीच्या लढतीत बेलिंडा बेनसीसवर ७-५, ७-५ असा विजय मिळवीत स्पर्धेत आगेकूच कायम राखली. दुसऱ्या सामन्यात पोलंडच्या एग्निस्जस्का रंदवान्स्काने जर्मनीच्या अ‍ॅना लेना फ्राईडस्मॅनवर तिने सरळ सेटमध्ये ६-७, ६-१, ७-५ अशी सरशी साधली. (वृत्तसंस्था)
स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हाचा सामना करण्यास आतुर आहे. हा सामना माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट खेळ करून सामना आपल्या नावे करण्याचा प्रयत्न राहील.
- सेरेना विल्यम्स, टेनिसपटू, अमेरिका
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनी आपापल्या जोडीदारांसह विजय मिळवीत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारताच्या पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह खेळताना मिश्र दुहेरीत अनास्तासिया पावलुचेनकोव्हा आणि डोमिनिक इंग्लोट या जोडीला १ तास आणि ९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-३, ७-५ ने धूळ चारली, तर बोपन्ना आणि ची तैपेईच्या युंग यान चान या जोडीने तृतीय मानांकनप्राप्त जॉन मिलमॅन आणि किम्बर्ली बिरेल या आॅस्ट्रेलियन खेळाडूंना अवघ्या ४७ मिनिटांत
७-५, ६-१ ने घरचा रस्ता दाखविला.
दरम्यान, पुरुष दुहेरी गटातील तिसऱ्या फेरीत बोपन्ना आणि रोमानियाच्या फ्लोरिन मर्जियाला टॅरीट हुए आणि मॅक्स मिर्नयी यांच्याकडून ४-६, ३-६ ने पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Joko, Serena, Federer Express Susate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.