जोको, सेरेनाला अग्रमानांकन
By Admin | Published: August 27, 2016 06:36 AM2016-08-27T06:36:54+5:302016-08-27T06:36:54+5:30
अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाला असून पुरुषांच्या गटात त्याला अग्रमानांकन मिळाले आहे.
न्यूयॉर्क : रिओ आॅलिम्पिकमध्ये धक्कादायक पराभवास सामोरे गेल्यानंतर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाला असून पुरुषांच्या गटात त्याला अग्रमानांकन मिळाले आहे. त्याचवेळी रिओ आॅलिम्पिकमध्ये अमेरिकेची बलाढ्य खेळाडू सेरेना विलियम्सलाही सनसनाटी पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र, हे अपयश विसरुन सेरेनाही अग्रमानांकीत खेळाडू म्हणून यूएस ओपनसाठी सज्ज झाली आहे.
२९ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत गतविजेता असलेला जोको आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने खेळेल. त्याचवेळी आॅलिम्पिकमध्ये सलग दोनवेळा सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केलेला ब्रिटनच्या अॅण्डी मरेला द्वितीय मानांकन लाभले आहे. तर, स्वित्झर्लंडचा वावरिंका आणि स्पेनचा राफेल नदाल यांना अनुक्रमे तिसरे व चौथे मानांकन मिळाले आहे.
दुसरीकडे, सहावेळची यूएस विजेती सेरेना कारकिर्दीत पाचव्यांदा या स्पर्धेत अव्वल मानांकीत असेल. विशेष म्हणजे, गतवर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच सेरेनाला रॉबर्टा विन्सीकडून पराभवाचा धक्का बसला होता आणि या पराभवासह सेरेनाचे कॅलेंडर ग्रँडस्लॅम पुर्ण करण्याचे स्वप्नही भंगले होते. (वृत्तसंस्था)
>साकेतची घोडदौड... भारताचा डेव्हीस कप खेळाडू साकेत मिनैनी याने मोसमातील अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनच्या पात्रता स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. २६वे मानांकन असलेल्या साकेतने आपली दिमाखदार कामगिरी कायम ठेवताना अमेरिकेच्या मिशेल क्रुएगरला एक तास २८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात ७-६, ६-४ असे नमवले. यावेळी दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम खेळ करताना प्रत्येकी ५ एस मारले.