राजस्थान क्रिकेट अध्यक्षपदी जोशी
By Admin | Published: June 3, 2017 12:44 AM2017-06-03T00:44:23+5:302017-06-03T00:44:23+5:30
काँग्रेस नेते सी. पी. जोशी हे आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांचे सुपुत्र रुचिर मोदी यांचा पराभव करीत राजस्थान
जयपूर : काँग्रेस नेते सी. पी. जोशी हे आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांचे सुपुत्र रुचिर मोदी यांचा पराभव करीत राजस्थान क्रिकेट संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान झाले. २९ मे रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. हायकोर्टाच्या आदेशानुसार शुक्रवारी निकाल जाहीर झाले. जोशी यांनी मोदी यांचा १९-१४ अशा फरकाने पराभव केला.
मतपेट्या आधी शासकीय कोषागारात ठेवण्यात आल्या होत्या. मतगणनेसाठी त्या आरसीए अकादमीत आणण्यात आल्या. निवडणूक अधिकारी ए. के. पांडे यांनी निकाल जाहीर केला. जोशी हे मोदी यांच्या तुलनेत अपेक्षेनुसार वरचढ ठरले. (वृत्तसंस्था)
आर्थिक अफरातफरीच्या आरोपात देश सोडून गेल्यानंतर लंडनमध्ये असलेले रुचिरचे वडील ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे.
या विजयासोबत जोशी यांनी मागील पराभवाचा वचपा काढला. मागच्या वर्षीच्या निवडणुकीत जोशी यांना चाहत्यांनी एकाकी पाडताच त्यांनी नाव परत घेतले होते.
ललित मोदी यांचे कडवे समर्थक असलेले राजेंद्रसिंग नंदू हे सचिवपदी निवडून आले. त्यांनी महेंद्र शर्मा यांचा १७-१६ ने काठावर पराभव केला. दुसरे समर्थक पिंकेश जैन हे कोषाध्यक्ष बनले आहेत. त्यांनी आझादसिंग यांचा १८-१५ ने तसेच उपाध्यक्षपदी निर्वाचित झालेले काँग्रेस नेते मोहम्मद इक्बाल यांनी रामप्रकाश चौधरी यांचा १९-१४ ने पराभव केला. दुसरे उपाध्यक्ष म्हणून जोश्ी गटाचे महेंद्रसिंग तिवारी यांनी शत्रुघ्न तिवारी यांचा १८-१५ ने पराभव केला. कार्यकारिणी सदस्यपदी के. के. निमावत हे निर्वाचित झाले. त्यांनी रमेश गुप्ता यांच्यावर १९-१४ ने मात केली. (वृत्तसंस्था)