आव्हानात्मक स्पर्धा जिंकल्याचा आनंद - मैत्रेयी

By admin | Published: April 3, 2015 12:53 AM2015-04-03T00:53:19+5:302015-04-03T00:53:19+5:30

नागपूरला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे स्वरुप भव्य होते. तेथील वातावरण पाहूनच आत्मविश्वास निर्माण झाला आणि मी केवळ खेळण्याचा आनंद घेत

The joy of winning challenging competition - Maitreya | आव्हानात्मक स्पर्धा जिंकल्याचा आनंद - मैत्रेयी

आव्हानात्मक स्पर्धा जिंकल्याचा आनंद - मैत्रेयी

Next

रोहित नाईक, मुंबई
नागपूरला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे स्वरुप भव्य होते. तेथील वातावरण पाहूनच आत्मविश्वास निर्माण झाला आणि मी केवळ खेळण्याचा आनंद घेत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सहभागी खेळाडूंची संख्या कमी होती, मात्र उच्च दर्जाच्या स्पर्धकांमुळे ही स्पर्धा अत्यंत खडतर व आव्हानात्मक होती. त्यामुळेच या विजेतेपदाचा खुप आनंद आहे, असे नुकताच राष्ट्रीय ज्युनियर कॅरम स्पर्धेत मुलींच्या युवा गटाचे विजेतेपद पटकवणाऱ्या महाराष्ट्राच्या मैत्रेयी गोगटेने ‘लोकमत’ सोबत बोलताना सांगितले.
मूळची रत्नागिरीची असलेल्या मैत्रेयीने नुकताच आॅल इंडिया कॅरम फेडरेशनच्या वतीने पार पडलेल्या राष्ट्रीय ज्युनियर कॅरम स्पर्धेत मुलींच्या युवा गटात चंदिगडच्या फरहिनविरुध्द पहिला गेम गमावल्यानंतर १६-१८, १८-१४, २५-० असे झुंजार विजेतेपद पटकावले. सध्या मुंबईत सुरु असलेल्या ५१व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतर जिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत मैत्रेयीला महिला एकेरी गटात अग्रमानांकन असून तीने या स्पर्धेत देखील विजेतेपद पटकावण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे पहिलेच राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्यानंतर मैत्रेयीने आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दिशेने पाऊल टाकणार असल्याचे सांगितले. याविषयी ती म्हणाली की, निश्चितंच या मोठ्या यशानंतर माझ्याकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मी २००६ सालापासून कॅरम खेळत आहे आणि माझा खेळ चांगलाच बहरात आला असल्याने आता मी आंतरराष्ट्रीय सामन्यांकडे लक्ष केंद्रीत केले असून त्यादृष्टीने माझी तयारी सुरु आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतील आव्हानात्मक सामन्यांविषयी मैत्रेयी म्हणाली की, उपांत्यपुर्व फेरीत आर. विनिथाचे कडवे आव्हान समोर होते. ती अनुभवाने वरिष्ठ असल्याने काहीसे दडपण होतेच. मात्र सामन्याला सुरुवात होताच मी पुर्णपणे सकारात्मक खेळ केला आणि सरळ दोन गेममध्ये बाजी मारली. या विजयामुळे माझा आत्मविश्वास खुप वाढला आणि यानंतरच्या उपांत्य सामन्यात पश्चिम बंगालच्या कसलेल्या काजोलचे तगडे आव्हान देखील परतवण्यात यशस्वी ठरले. त्यामुळेच या स्पर्धेतील विजेतेपदाशिवाय बलाढ्य व अनुभवी खेळाडूंना पराभूत केल्याचा आनंद जास्त आहे.
दरम्यान मुंबईत सुरु असलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी मैत्रेयीने विजेतेपदासाठी लक्ष्य ठेवले असून विजेतेपदाच्या मोहिमेमध्ये माजी सार्क व राज्य विजेती आयेशा मोहम्मदचे मुख्य आव्हान असेल असेही मैत्रेयीने यावेळी सांगितले.

Web Title: The joy of winning challenging competition - Maitreya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.