Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 01:12 PM2024-08-02T13:12:50+5:302024-08-02T13:13:40+5:30

स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर कोल्हापूरपासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढणार 

Jubilation in Kambalwadi village and Kolhapur after Swapnil Kusale won Paris Olympics bronze medal | Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

बाजीराव फराकटे

शिरगाव : ना मोबाइलला नेटवर्क, ना माणसांचा वेशीबाहेरचा वावर.. सारा काही व्यवहार आडवळणाच्या दुर्गम भागातच.. पण, गुरुवारचा दिवस त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरला. ज्यांची नावं केवळ टीव्हीवर ऐकायचो त्या मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांचे मोबाइल थेट कांबळवाडीतील (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) रेंज शोधू लागल्याने उभा गाव हरखून गेला. ही किमया ज्या कुसाळे परिवारातील पोरामुळे घडली त्या नातवाच्या पराक्रमाने हरखून गेलेली आजी, कष्टाचे पांग फेडल्याने गदगदलेले आई-वडील अन् टीचभर गावाचे नाव जगभर केल्याने आनंदून गेलेला गाव असे उत्साही चित्र गुरुवारी कांबळवाडीकरांनी अनुभवले.

स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातल्यानंतर त्याचे कुटुंब आनंदात न्हाऊन निघाले. सकाळपासून आई अनिता, वडील सुरेश, आजोबा महादेव, आजी तुळसाबाई, लहान भाऊ सूरज, चुलते शिक्षक शिवाजी, चुलती मनीषा व भावंडे टीव्हीसमोर बसून होते. क्षणाक्षणाला त्यांची उत्कंठा वाढत होती. तो जिंकेल हा विश्वास असला तरी खेळ खेळ असतो, याची जाणीवही त्यांना होती. दुपारी स्वप्नीलने कांस्यपदकाला गवसणी घातल्यानंतर सारे कुटुंब भरपावसात आनंदाने चिंब झाले.

एकमेकांना त्यांनी कडकडून मिठी मारल्या. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. मुलासाठी घेतलेले कष्ट अन् त्याने कांस्यपदक मिळवून केलेली उतराई या भावनेने आई अनिता यांना गदगदून आले. आजी तर पुरती हरखून गेली. वडील सुरेश यांच्या आनंदाला भरते आले. काय करू आणि काय नको अशीच काहीशी त्यांची स्थिती झाली होती.

खणाणले मोबाइल

स्वप्नीलने कांस्यपदक मिळवल्यानंतर त्याच्या घरातील मोबाइल खणाणू लागले. देशभरातून त्याच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षावर करण्यात आला. विशेष म्हणजे आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांच्या रांगा कांबळवाडीत लागल्या.

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मोबाइलवरून फोन करून सुरेश कुसाळे यांचे अभिनंदन केले. भविष्यात लागेल ती मदत शासनाच्या वतीने दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. लवकरच त्याचा सन्मान केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनीही सुरेश कुसाळे यांचे अभिनंदन केले. लवकरच कांबळवाडी गावात येऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अभिनंदन करत कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर नेल्याचा अभिमान असल्याचे सांगितले.

स्वप्नील याने पदक जिंकून दिल्यावर गावात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आताषबाजी, गुलालाची उधळण व ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत अनेकांनी कुसाळे कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक

स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर कोल्हापूरपासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी सांगितले.

Web Title: Jubilation in Kambalwadi village and Kolhapur after Swapnil Kusale won Paris Olympics bronze medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.