ज्युनिअर रेंजर्सचे जेतेपद
By admin | Published: November 2, 2016 03:42 AM2016-11-02T03:42:35+5:302016-11-02T03:42:35+5:30
अंतिम सामन्यात ज्युनिअर रेंजर्स संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कलिना व्हिलेज बॉइज संघाचा ६-५ असा पाडाव केला.
मुंबई : अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ज्युनिअर रेंजर्स संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कलिना व्हिलेज बॉइज संघाचा ६-५ असा पाडाव केला. या शानदार विजयासह ज्युनिअर रेंजर्सने १६व्या कलिना फुटबॉल लीग (केएलएल) मुलांच्या १६ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले.
अवर लेडी आॅफ इजिप्त पॅरिश चर्च स्पोटर््स कमिटीच्या वतीने झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना निर्धारीत वेळेत २-२ असा बरोबरीत सुटला. यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना ज्युनिअर रेंजर्सने बाजी मारली. दरम्यान, सामन्याची आक्रमक सुरुवात करताना रेंजर्सने कमालीचे नियंत्रण राखले. अॅरॉन डीसा आणि कीगान पिंटो यांनी कलिना व्हिलेज संघाच्या क्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारताना प्रत्येकी एक गोल झळकावून रेंजर्सला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली. मात्र, या आघाडीचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले.
यावेळी, कलिना व्हिलेजच्या खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करताना सामन्यात बरोबरी साधली. लबॅन परेरा याने शानदार दोन गोल झळकावून संघाला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. परंतु, रेंजर्सने यानंतर भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना निर्धारीत वेळेत बरोबरी कायम राखून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये रेंजर्सच्या इवान फर्नांडिस, तिलक शेट्टी, अॅरॉन लोबो आणि सिध्दार्थ शुक्ला यांनी आपआपली संधी यशस्वीपणे साधत संघाच्या जेतेपदामध्ये निर्णायक कामगिरी केली. तर, व्हिलेज बॉइज संघाकडून अल्ड्रीन फर्नांडिस, अमान खान आणि फैझान शेख यांनाच गोल करण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)