ज्युनिअर टीम इंडियाचे खाण्याचे वांदे
By admin | Published: February 8, 2017 11:53 PM2017-02-08T23:53:42+5:302017-02-08T23:53:42+5:30
निश्चलीकरण आणि बीसीसीआयविरुद्ध लोढा समितीवादाचा फटका इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ज्युनिअर टीम इंडियाला (१९ वर्षांखालील) चांगलाच बसला आहे.
मुंबई : निश्चलीकरण आणि बीसीसीआयविरुद्ध लोढा समितीवादाचा फटका इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ज्युनिअर टीम इंडियाला (१९ वर्षांखालील) चांगलाच बसला आहे. लोढा समितीविरुद्धचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने खेळाडू, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि अन्य सहकाऱ्यांना दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळत नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांचे खाण्याचेही वांदे झाले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरुद्ध लोढा समिती हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची गच्छंती झाल्याने बीसीसीआयमध्ये आर्थिक व्यवहाराचे अधिकार अद्याप कोणालाही देण्यात आलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना ‘टीम इंडिया’साठी आवश्यक असलेले आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, १९ वर्षांखालील संघ जोहरी यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे या संघाची दैन्यावस्था झाली आहे.
१९ वर्षांखालील भारतीय संघाची राहण्याची सोय महागड्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. तेथे नाष्टा मोफत आहे. मात्र जेवणासाठी पैसे आकारले जातात. हा खर्च भागवताना खेळाडूंची चांगलीच तारेवरची कसरत होत आहे. कोणी आपल्या वैयक्तिक खर्चाने, तर कोणी पालकांकडून खर्चासाठी पैसे घेऊन दिवस ढकलत आहे. सध्या इंग्लंड (१९ वर्षांखालील) संघ एका महिन्याच्या भारत दौऱ्यावर आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडचा ३-१ असा धुव्वा उडविला. मात्र आर्थिक त्रासामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
नोटाबंदीमुळे आठवड्यात २४ हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. यामुळे दैनंदिन खर्च रोखीने देण्यावर मर्यादा येत आहेत. सध्या तरी संघाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र मालिका संपताच खेळाडू आणि सहकाऱ्यांच्या खात्यात दैनंदिन खर्चाचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या वतीने देण्यात आली आहे.
‘१५०० रुपयां’चे एक सॅन्डवीच
इंग्लंड १९ वर्षांखालील संघ भारतात पाच एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असला तरी तेथे रात्रीचे जेवण स्वखर्चाने करावे लागत आहे. हॉटेलमध्ये एक सॅन्डवीच १५०० रुपयांचे असल्याचे खेळाडूंनी सांगितले.