ज्युनिअर संघाला जेतेपद
By admin | Published: December 22, 2015 03:04 AM2015-12-22T03:04:25+5:302015-12-22T03:04:25+5:30
डावखुरा मध्यमगती गोलंदाज खालिद अहमदच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध मारा आणि सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताच्या
कोलंबो : डावखुरा मध्यमगती गोलंदाज खालिद अहमदच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध मारा आणि सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताच्या अंडर-१९ क्रिकेटपटूंच्या संघाने अंतिम लढतीत यजमान श्रीलंकेचा ९७ चेंडू व ५ गडी राखून सहज पराभव केला आणि तिरंगी मालिकेत जेतेपदाचा मान मिळवला.
भारतीय संघाने विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य ३३.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सुंदर (५६) व ऋषभ पंत (३५) यांनी सलामीला ८९ धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली होती.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय श्रीलंका अंडर-१९ संघाच्या अंगलट आला. भारतातर्फे अवेश खानने २४ धावांच्या मोबदल्यात २ आणि खालिदने २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत यजमान संघाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. श्रीलंका संघाची ७ बाद ८१ अशी अवस्था झाली होती. विशाद रंदिका डिसिल्वा (५६) याने अर्धशतकी खेळी करताना दमिता सिल्वा (२३) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केल्यामुळे श्रीलंका संघाला दीडशेचा पल्ला ओलांडता आला. श्रीलंका संघाचा डाव ४७.२ षटकांत १५८ धावांत संपुष्टात आला.
सुंदर व पंत यांनी भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. पंतने डावातील तिसऱ्या षटकात असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. त्याने चॅरित असालंकाच्या गोलंदाजीवर षटकारही ठोकला, पण या आॅफस्पिनरच्या पुढच्याच षटकात तो माघारी परतला. सुंदरने अर्धशतकी खेळीत काही आकर्षक फटके मारले. सुंदरने ७७ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार ठोकले. रिकी भुई (नाबाद २९ धावा, १ चौकार व १ षटकार) याने संयमी फलंदाजी करताना संघाला लक्ष्य गाठून दिले. जेतेपद पटकावणाऱ्या अंडर - १९ संघाचे बीसीसीआयने अभिनंदन केले. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टिष्ट्वट केले, ‘श्रीलंकेत तिरंगी मालिका जिंकणाऱ्या भारताच्या अंडर-१९ संघाचे अभिनंदन. द्रविडचे मार्गदर्शन व खेळाडू घेत असलेली मेहनत, याचे परिणाम दिसत आहेत.’ दिग्गज फलंदाज राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. (वृृत्तसंस्था)