ज्वाला, अश्विनीला सरकारकडून संपूर्ण सहकार्य
By Admin | Published: July 9, 2015 12:56 AM2015-07-09T00:56:37+5:302015-07-09T00:56:37+5:30
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी साई, तसेच सरकारकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची ओरड केली होती. याशिवाय राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद हे प्रशिक्षणात पक्षपात करतात
नवी दिल्ली : ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी साई, तसेच सरकारकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची ओरड केली होती. याशिवाय राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद हे प्रशिक्षणात पक्षपात करतात, असाही गंभीर आरोप केला. गोपीचंद यांनी या आरोपाचा इन्कार करीत भारताच्या या महिला दुहेरी जोडीला सर्व सरकारी लाभ मिळत असल्याचे स्पष्ट केले.
कॅनडा ओपनचे जेतेपद पटकाविल्यानंतर ज्वाला-अश्विनी यांनी सर्व खेळाडूंसोबत समान व्यवहार व्हावा, तसेच गोपीचंद यांनी राष्ट्रीय कोच पदावरून पायउतार होण्याची मागणी केली. ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’मधून हेतुपुरस्सर बाहेर ठेवल्याचाही आरोप केला होता. ज्वालाने टीओपी योजनेतून वगळण्यात आल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अश्विनीनेदेखील टीओपी योजनेबाबत क्रीडा मंत्रालय योग्य सल्ला देत नसल्याचे मीडियाला सांगितले होते. साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांनी मात्र गोपीचंद यांचे समर्थन करीत राष्ट्रीय कोच, साई किंवा मंत्रालय कुठल्याही खेळाडूंसोबत भेदभाव करीत नसल्याचे सांगितले होते. टोओपी योजनेबाबत गोपीचंद म्हणाले, ‘‘टीओपी योजना प्रतिभाशोध मोहीम आहे. यात अनेकांचा समावेश आहे. या दोघींचा समावेश नसला, तरी त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील. दोन्ही खेळाडू कोचिंग शिबिराचा भाग आहेत. बेंगळुरू येथे आमच्याकडे एक विदेशी कोच आहेच, पण लवकरच आम्हाला मलेशियन कोच मिळणार आहे.’’