ज्वाला-आश्विनी जोडीला विजेतेपद
By admin | Published: June 30, 2015 02:07 AM2015-06-30T02:07:55+5:302015-06-30T02:07:55+5:30
ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने येथे ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या कॅनडा ओपन ग्रांप्रीच्या निर्णायक लढतीत इफ्जे मुस्केरन्स आणि सेलेना पीक
कॅलगेरी : ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने येथे ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या कॅनडा ओपन ग्रांप्रीच्या निर्णायक लढतीत इफ्जे मुस्केरन्स आणि सेलेना पीक या डच जोडीला सरळ सेट्समध्ये पराभूत करताना महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
तृतीय मानांकित भारतीय जोडीने ३५ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी जोडी १९-१९ बरोबरीवर होती. या वेळी एकमेव गेम पॉइंटचा फायदा घेत त्यांनी पहिला गेम जिंकला. पहिल्या गेममध्ये आघाडी मिळवल्यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये शानदार कामगिरी केली आणि लवकरच १५-६ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मुस्केन्स आणि पीक जोडीने जबरदस्त मुसंडी मारताना ९ गुण प्राप्त करीत स्कोअर १५-१५ असा बरोबरीत केला; परंतु भारतीय जोडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व ठेवताना पुढील सातपैकी ६ गुण जिंकताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
लंडन आॅलिम्पिक २0१२ नंतर पुन्हा एकदा ज्वाला आणि आश्विनीबरोबर खेळणे सुरू केल्यानंतर या जोडीचे हे पहिलेच विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)
आत्मविश्वास उंचावणारा विजय : आश्विनी
नवी दिल्ली : ज्वाला गुट्टाच्या साथीने कॅनडा ओपनमध्ये महिला दुहेरीत विजेतेपद मिळवल्यानंतर उत्साह वाढलेली भारतीय स्टार बॅडमिंटन खेळाडू आश्विनी पोनप्पा हिने दोघांच्या कामगिरीतील सातत्य हे यशाचे गुपित असून, या विजयामुळे आॅगस्ट महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेआधी आत्मविश्वास उंचावणारी बाब असल्याचे म्हटले आहे.
आश्विनी म्हणाली, ‘‘हा शानदार विजय आहे. आम्ही चांगले खेळलो आणि आमच्या कामगिरीत सातत्य राहिले. विश्व चॅम्पियनशिपच्या उंबरठ्यावर विजेतेपद जिंकणे ही बाब आत्मविश्वास उंचावणारी आहे. स्वाभाविकपणे आॅगस्ट महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिप हे आमचे पुढील लक्ष्य आहे.’’