ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा अखेर टीओपीत दाखल
By admin | Published: September 15, 2015 11:46 PM2015-09-15T23:46:40+5:302015-09-15T23:46:40+5:30
उशिरा का होईना पण, अखेर ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांचा टीओपी योजनेमध्ये समावेश करीत मंत्रालय व मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदविरुद्ध पक्षपातीपणाचा
नवी दिल्ली : उशिरा का होईना पण, अखेर ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांचा टीओपी योजनेमध्ये समावेश करीत मंत्रालय व मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदविरुद्ध पक्षपातीपणाचा या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या आरोपामुळे उद््भवलेल्या वादावर पूर्णविराम लागला. ज्वाला व अश्विनी यांच्या व्यतिरिक्त पुरुष दुहेरीतील जोडी सुमित रेड्डी व मनू अत्री यांचाही टारगेट आॅलिम्पिक पोडियम (टीओपी) योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
मंत्रालयाने प्रसिद्धिला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,‘बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा,
सुमित रेड्डी व मनू अत्री यांची
टीओपी योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांना रिओ आॅलिम्पिक २०१६ च्या तयारीसाठी एनएसडीएफतर्फे आर्थिक मदत मिळेल.’
मलेशियाचे प्रसिद्ध दुहेरीचे प्रशिक्षक किम तान हर यांच्यासोबत भारतीय बॅडमिंटन महासंघाने पाच वर्षांचा करार केलेला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘आता दुहेरीतील खेळाडू पुढील रिओमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकच्या तयारीसाठी रणनीती तयार करू शकतात. या खेळाडूंना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये मंत्रालयाने स्पष्ट केले की, दुहेरीतील मुख्य प्रशिक्षकांसोबत चर्चा करून रणनीती तयारी करणे आणि आवश्यक सोयी सुविधांची यादी पाठविण्यात यावी.’
टीओपी योजनेसाठी यापूर्वी निवड झालेल्या सहा बॅडमिंटनपटूंमध्ये लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, दोनदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली पी.व्ही. सिंधू यांच्या व्यतिरिक्त पारुपल्ली कश्यप, के. श्रीकांत, गुरू साईदत्त आणि एच.एस. प्रणय यांचा समावेश आहे. यानंतर ज्वाला व अश्विनी यांनी त्यांनाही या योजनेमध्ये स्थान देण्याची
मागणी केली होती. जुलैमध्ये
क्रीडा मंत्रालयाने या दोघींचा यात समावेश करण्याचा निर्णय घेतला. एकेरीतील सहा खेळाडूंचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता तेव्हापासून ज्वाला व
अश्विनी मंत्रालय व गोपीचंद यांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत होत्या. गोपीचंद टीओपी समितीमध्येही आहेत. ज्वाला व अश्विनी यांनी २०११ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य, २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४ मध्ये रौप्य पदक पटकावले आहे.
त्यांनी गेल्या वर्षी उबेर कप
व आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला. मनू आणि सुमित यांनी गेल्या
रविवारी बेल्जियम इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये जेतेपद पटकावले.
त्यांनी जुलै महिन्यात लागोस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. (वृत्तसंस्था)