तांड्यावरच्या ज्योतीने मारली आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 09:54 AM2019-10-31T09:54:36+5:302019-10-31T09:55:20+5:30
भरारी; एशियन बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात निवड; नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये होणार स्पर्धा
-महेश पाळणे
लातूर : उत्कृष्ट पिचर म्हणून राज्यभरात ख्याती असलेल्या लातूरच्या ज्योती पवारने जिद्द व चिकाटीच्या जोरावर बेसबॉल खेळात भीमपराक्रम केला आहे. चायना येथे होणाऱ्या महिलांच्या दुसऱ्या एशियन चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात आपली जागा पक्की करून लातूरची क्रीडा क्षेत्रात पताका उंचावली आहे.
मूळची औसा तालुक्यातील नांदुर्गा तांडा येथील ज्योती व्यंकट पवार बेसबॉलची उत्कृष्ट खेळाडू. घरची परिस्थिती बेताचीच. वडील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणासाठी हे कुटुंब लातुरात आले. ज्योतीने क्रीडा क्षेत्रात यशाचे नवे शिखर गाठल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेसबॉलसह सॉफ्टबॉल खेळातही ज्योतीचे कौशल्य उत्तम आहे.
राजर्षी शाहू महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेणाºया ज्योतीला लहानपणापासूनच बेसबॉलची आवड. जिजामाता विद्यालयात असताना तिच्यातील क्रीडागुण लक्षात घेता मार्गदर्शक दैवशाला जगदाळे यांनी तिला प्रशिक्षण दिले. आई-वडील दोघेही अशिक्षित. मात्र ज्योतीने आपल्या जिद्दीच्या बळावर शालेय जीवनातही अनेक स्पर्धा गाजविल्या.
राज्यस्तरावर दहा वेळा सहभाग नोंदविला असून, दोन वेळा आपल्या संघास सुवर्ण तर दोन वेळा रौप्यपदक पटकावून देत लातूरचा लौकिक केला आहे. यासह महाराष्ट्राकडून खेळताना दोनवेळा राज्याच्या संघास रौप्य तर एकवेळा कांस्यपदक मिळवून दिले आहे. पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या निवड चाचणीत उत्कृष्ट खेळ करून दिल्ली येथे झालेल्या स्कूल गेम फेडरेशन आॅफ इंडियाच्या अंतिम निवड चाचणीतही तिने आपली जागा पक्की केली होती. एकंदरित, हलाखीच्या परिस्थितीत ज्योतीने मिळविलेले हे यश युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरेल.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेची हुकली होती संधी...
यापूर्वी ज्योतीची भारतीय संघाच्या अंतिम निवड चाचणीसाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर भारतीय संघाची निवड होणार होती. मात्र त्यावेळी महिलांच्या स्पर्धा न झाल्याने ज्योतीचे स्वप्न अधुरे राहिले. त्यानंतर ज्योतीने कसून सराव करीत आपल्या खेळात सुधारणा केली. त्या जोरावर आज तिची भारतीय संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय अॅम्युचर बेसबॉल फेडरेशनच्या वतीने ती ९ ते १५ नोव्हेंबर दरम्यान चायना येथील झॉनशॅन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी लवकरच रवाना होणार आहे. यासाठी भारतीय संघाचे सराव शिबीर पंजाब येथील जालंधर येथे सुरू आहे.
बेस्ट पिचर अॅवॉर्डने सन्मानित...
जवळपास १० राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागासह ९ वेळा ज्योतीने राष्ट्रीय स्पर्धेत छाप सोडली आहे. त्यातील अनेक स्पर्धांत उत्कृष्ट पिचरच्या जोरावर तिने आपल्या संघास पदक मिळवून दिले आहे. अनेकवेळा तिला राज्य व राष्ट्रीय स्तरावर बेस्ट पिचर अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तिला जहांगीर शेख, शिवाजी पाटील, नारायण झिपरे, प्रेमराज पौळ, व्यंकटेश झिपरे, राहुल खुडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
भारतीय संघ निवडीची होती जिद्द...
यापूर्वी स्कूल गेमच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी होती. स्पर्धा न झाल्याने ती हुकली. आता संघटनेच्या वतीने खेळण्याची संधी मिळाली. यात उत्कृष्ट कामगिरी करू. आर्थिक अडचण असतानाही राजर्षी शाहू महाविद्यालय, रोटरी क्लब व प्रशिक्षकांनी केलेल्या मदतीमुळे मी आज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले, याचा मनस्वी आनंद असल्याचे ज्योती पवारने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.