कबड्डी : दत्तगुरु क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 08:26 PM2019-11-20T20:26:26+5:302019-11-20T20:26:41+5:30
पहिल्या फेरीच्या सामन्यात दत्तगुरुने ओम साई मंडळाचा २९-२१ असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.
मुंबई : दत्तगुरु क्रीडा मंडळ, प्रजित क्रीडा मंडळ, गरुडझेप क्रीडा मंडळ, गावदेवी क्रीडा मंडळ यांनी मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “ जिल्हा अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटाची दुसरी फेरी गाठली. नेहरू नगर – कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या चाचणी स्पर्धेतील कुमारांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात दत्तगुरुने ओम साई मंडळाचा २९-२१ असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. शिल्पेश गुरव, आकाश यांनी दत्तगुरुला पहिल्या डावात १३-०३ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या डावात मात्र ओम साईंच्या जेफिन मॅथ, सुनील उखेडा यांनी चतुरस्त्र खेळ करीत सामन्याची रंगत वाढविली. पण संघाला विजयी करण्यास तो खेळ कमी पडला.
याच गटात प्रजित मंडळाने छत्रपती मंडळाला ३२-२९असे नमवित आगेकूच केली. पार्थ कदम, सुमित घावरे यांच्या झंजावाती खेळाने प्रजित संघाला विश्रांतीला २४-११ अशी मोठी आघाडी मिळवून दिली होती. विश्रांतीनंतर मात्र छत्रपतींच्या सोहम महाडिक, हर्षल शिंदे यांनी टॉप गिअर टाकत सामन्यात चुरस निर्माण केली. पण ३गुणांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवशक्ती क्रीडा मंडळाने मध्यांतरातील १७-१७ अशा बरोबरी नंतर गरुडझेप मंडळाचा ३२- २४ असा पाडाव केला. राहुल गुप्ता, हिमेश पांडे यांनी मध्यातरानंतर आपला खेळ अधिक गतिमान करीत शिवशक्तीला हा विजय मिळवून दिला. गरुडझेपच्या शुभम परब, राकेश परब यांनी सुरुवात उत्तम केली, पण त्याचा शेवट गोड मात्र त्यांना करणे जमले नाही. गावदेवी मंडळाने चुरशीच्या लढतीत जय भवानी तरुण मंडळाचा कडवा प्रतिकार १८-१६ असा मोडून काढला. पूर्वार्धात ०३-११ अशा पिछाडीवर पडलेल्या गावदेवी मंडळाला ही किमया साधुन दिली ती प्रसाद व सतेज या कांबळे बंधूंच्या चतुरस्त्र खेळाने. नीरज पवार, शुभम कदम यांनी पूर्वार्धात खेळ करीत जय भवानी संघाला मध्यांतराला आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात तो जोश त्यांना राखता आला नाही.
व्दितीय श्रेणी गटाच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात संभाजी क्रीडा मंडळाला २३-२४ असे चकविले. विराज मोरे, अमेय बागवे याच्या नेत्रदीपक खेळाला याचे सारे श्रेय जाते. सुतेज पाटील, संदेश पालेकर यांचा चतुरस्त्र खेळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा पराभव टाळण्यास कमी पडला. शिवसाई क्रीडा मंडळाने गायत्री स्पोर्टसला २६-०९ असे नमविलें ते गौरव सिंग, योगेश कावठकर यांच्या उत्तम खेळामुळे. गायत्रीचा दीपेश पटेल चमकला. प्रफुल्ल बांगर, आनंद मेस्त्री यांच्या आक्रमक चढाई पकडीच्या खेळामुळे नवरत्न मंडळाने हनुमान मंडळाला २५-१७ असे पराभूत केले. हनुमान कडून ओमकार महाडिक, मंदार घाग छान खेळले. गौडघर हौशी मंडळाने जय गणेश मंडळावर २४-१३ अशी मात केली. अनिकेत नाक्ती, अभिषेक गोसावी गौडघर कडून, तर उमेश आडावे पराभूत संघाकडून उत्तम खेळले. शेवटच्या सामन्यात गावदेवीने राऊडी स्पोर्ट्सला १५-१३ असे चकित केले. गावदेवी कडून शैलेश बिऱ्हाडी, जयेश भापदे, तर तन्मय ढेकणे, हर्षवर्धन खांडेकर राऊडी कडून सर्वोत्तम खेळले.