‘प्रो कबड्डीद्वारे जुने दिवस अनुभवतोय’

By admin | Published: July 16, 2015 02:20 AM2015-07-16T02:20:50+5:302015-07-16T08:45:58+5:30

प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्राला मिळालेल्या तुफान यशानंतर कबड्डी चाहत्यांना वेध लागले ते दुसऱ्या सत्राचे. जसजशी १८ जुलै जवळ येत आहे सगळीकडे प्रो कबड्डीच्या

'Kabaddi is experiencing old days' | ‘प्रो कबड्डीद्वारे जुने दिवस अनुभवतोय’

‘प्रो कबड्डीद्वारे जुने दिवस अनुभवतोय’

Next

- रोहित नाईक, मुंबई
प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्राला मिळालेल्या तुफान यशानंतर कबड्डी चाहत्यांना वेध लागले ते दुसऱ्या सत्राचे. जसजशी १८ जुलै जवळ येत आहे सगळीकडे प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राच्या चर्चेला वेग येत आहे. क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंसोबतच बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतील सेलिब्रेटींची असलेली उपस्थिती यामुळे प्रो कबड्डीला ग्लॅमरचा जबरदस्त तडका बसला. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा शेहनशहा ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी थेट प्रो कबड्डीचे ‘ले पंगा’ हे थीम साँग गाऊन रंगत आणली.
विशेष म्हणजे हे गाणे हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत गायल्याने सध्या ‘बिग बी’चा आवाज चांगलाच गाजतोय. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर संघाचे कट्टर पाठिराखे असलेले अमिताभ बच्चन स्वत: कबड्डीप्रेमी असल्याने प्रो कबड्डीच्या निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद....

कबड्डी खेळाडू म्हणून तुमचा अनुभव कसा आहे?
खुपच अप्रतिम. सुरुवातीलाच सांगितल्यामुळे या लीगच्या माध्यमातून मी जुने दिवस पुन्हा एकदा अनुभवतोय. आम्ही अलाहाबादला असताना रोजच कबड्डी खेळायचो. कबड्डी आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता.

तुम्ही कबड्डीकडे कसे आकर्षिक झालात?
लहानपणापासून अलाहाबाद येथे मी मित्रांसोबत कबड्डी खेळत आलोय. कबड्डीसोबत माझ्या खुप आठवणी जोडल्या आहेत. ज्यावेळी प्रो कबड्डी आयोजकांनी खेळाच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याची विनंती दिली, तेव्हा मी लगेच तयार झालो. कारण याद्वारे मला पुन्हा एकदा माझे जुने दिवस अनुभवण्याची संधी मिळणार होती. तसेच, अभिषेकने जयपूर पिंक पँथर टीम विकत घेतल्याने त्याची टीम देखील प्रो कबड्डीशी जोडण्याचं एक कारण आहे.

प्रो कबड्डीद्वारे देशात कबड्डीचा प्रसार होण्यास कशी मदत होत आहे?
या स्पर्धेद्वारे आज देशामध्ये कबड्डीची क्रांती झाली आहे. पहिले म्हणजे खेळ घराघरांत पोहचला आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांपर्यंत हा खेळ नेण्यासाठी या लीगची संकल्पना अविश्वसनीय आहे. कबड्डी चाहत्यांनी देखील या लीगला मोठा प्रतिसाद देत यशस्वी केले. या लीगचा भविष्यात आणखी यशस्वी प्रसार होईल याची मला खात्री आहे. आज कबड्डीचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला असून कबड्डीपटूंना सेलिब्रेटी म्हणून ओळख मिळाली आहे.

प्रो कबड्डी ‘थीम साँग’बद्दल सांगा?
ज्यावेळी मला हे गाणे गाण्यासाठी विचारण्यात आले तेव्हा याची धून आधीच तयार होती व एक गोष्ट लक्षात आली की हे गाण केवळ एका चॅनलसाठी बनविण्यात आले आहे. कबड्डीला अधिकआधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मला काही बदल करणे आवश्यक असल्याचे जाणवले. मी हे गाणं म्युझिक डायरेक्टर आदेश श्रीवास्तव यांच्या सोबतीने थोडं वेगवान केलं. त्यानुसार आम्ही हिंदी व मराठी भाषेत रेकॉर्डींग केल. मी संगीतातील कोणतेही शिक्षण घेतले नाही. मी गायक देखील नाही. मात्र यापुर्वी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये मी गाणे गायले असल्याने त्याचा अनुभव येथे कामी आला. हे गाणं सर्वांना नक्कीच आवडेल.

कबड्डी व खेळाडूंसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत का?
नक्कीच. या लीगमुळे आज खेळाडूंना देशभरात ओळख मिळाली आहे. इतर खेळांच्या तुलनेत कमी प्रसिध्दी असलेला ‘कबड्डी’, आज सर्वाधिक टीव्ही प्रेक्षकवर्ग लाभलेला दुसऱ्या क्रमांकाचा खेळ ठरला. त्याव्यतिरिक्त सांगायचे झाल्यास आजपर्यंत कधीही प्रकाशझोतात न आलेल्या खेळाडूंसाठी या लीग द्वारे चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. या जोरावर त्यांनी स्वत:ला सिध्द केलेच आणि देशाला देखील या खेळाडूंची ओळख मिळाली. एकूणच, निश्चितच या लीगमुळे खेळ व खेळाडूंचे ‘अच्छे दिन’ आले आहेत.

या लीगमध्ये तुमची भूमिका काय आहे?
या लीगच्या ‘थीम साँग’ला मी संगीत दिले असून स्वत: गायले आहे. खेळाविषयी म्हणाल तर, कबड्डी खेळाच्या प्रसारासाठी माझा कायमच सहभाग असेल. शिवाय वैयक्तिकरीत्या मी अभिषेकच्या टीमला पाठिंबा देऊन स्वत: खेळाचा आनंद लुटणार.

अभिषेकची टीम गतविजेती आहे. काय सांगाल?
जयपूर पिंक पँथर खूप एकजूट आणि समतोल संघ आहे. गत वर्षी विजेतेपद पटकावून त्यांनी हे सिध्द केले आहे. यंदाच्या त्यांच्या कामगिरीकडे निश्चितच माझे लक्ष असेलच . त्याचबरोबर माझा कायमच त्यांना पाठिंबा आहे. जयपूर पिंक पँथरला या वर्षीच्या यशस्वी कामगिरीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा...

तुमच्या काळातील कबड्डी आणि आजची कबड्डी.. किती फरक वाटतो?
आमच्यावेळी कबड्डी खुप मर्यादित स्वरुपात होती. संध्याकाळी मनोरंजन म्हणून आम्ही सगळे मित्र कबड्डी खेळायचो. मात्र आता कबड्डीने कात टाकली आहे. खेळात व्यावसायिकता आल्याने प्रत्येक विविध संघटना आणि फेडरेशन अत्यंत सक्षम झाले आहेत. त्यामुळे सहाजिकच राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कबड्डीने एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. कबड्डीने आणखी प्रगती करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे स्थान निर्माण करावे हिच माझी इच्छा आहे.

Web Title: 'Kabaddi is experiencing old days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.