‘कबड्डी..कबड्डी’चा दम रंगणार
By admin | Published: January 22, 2016 02:57 AM2016-01-22T02:57:48+5:302016-01-22T02:57:48+5:30
देशभरात जबरदस्त लोकप्रियता मिळवलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे तिसरे पर्व ३० जानेवारीपासून विशाखापट्टणम येथून सुरु होईल
नवी दिल्ली : देशभरात जबरदस्त लोकप्रियता मिळवलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे तिसरे पर्व ३० जानेवारीपासून विशाखापट्टणम येथून सुरु होईल. त्याचवेळी सामन्यादरम्यान खेळाची ओळख असलेल्या ‘कबड्डी... कबड्डी’चा उच्चार करण्यास खेळाडूंना सूचित केले असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितल्याने यंदा सर्वच रेडर्सची मोठी कसोटी लागेल.
नवी दिल्ली येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पर्धा आयोजकांनी कबड्डी लीगच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली. खेळताना होणारा ‘कबड्डी... कबड्डी’ चा उच्चार ही खेळाची मुख्य ओळख आहे. पहिल्या दोन पर्वात हे कमी प्रमाणात पाहण्यास मिळाले. मात्र ही बाब कबड्डीची मुख्य ओळख असून त्यादृष्टीने आम्ही सर्व खेळाडूंना सूचितही केले असल्याचे, स्पर्धा आयोजक टीमचे अनुपम गोस्वामी यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी लीगचे मुख्य प्रवर्तक चारु शर्मा, जयपूर पिंक पँथर संघमालक अभिषेक बच्चन, कर्णधार नवनीत गौतम, यू मुम्बा कर्णधार अनुप कुमार, दबंग दिल्ली कर्णधार काशिलींग आडके आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन सिंग गेहलोत उपस्थिती होते. (प्रतिनिधी)
महिलांचीही स्पर्धा.....
पुरुषांच्या स्पर्धेला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर महिलांचीही लीग का आयोजित होत नाही? यावर अभिषेक बच्चन म्हणाला की, निश्चितच आमचा त्या दृष्टीने विचार सुरु असून भविष्यात महिलांची लीग होऊ शकते, असे वक्तव्य करुन उत्सुकता वाढवली.
चौथे पर्व जुन - जुलैमध्ये
लीगचे तिसरे पर्व सुरु होत नाही तोपर्यंत आयोजकांनी लीगच्या चौथ्या पर्वाची घोषणा करुन सर्वांनाच धक्का दिला. अनुपम गोस्वामी यांनी सांगितले की, तिसऱ्या पर्वनंतर याच वर्षी जुन - जुलैमध्ये स्पर्धेचे चौथे पर्व येईल. यामुळे आता वर्षभरात ८० दिवस कबड्डीचा थरार पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळेल.