कबड्डी : टी.बी.एस. स्पोर्ट्स, शिवास संघ अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 01:49 PM2019-12-22T13:49:10+5:302019-12-22T13:49:39+5:30

सचिवालय जिमखाना, मुंबई पोष्टल, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस पुरुष प्रथम श्रेणी व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत धडकले.

Kabaddi: TBS Sports, Shivas team in the final | कबड्डी : टी.बी.एस. स्पोर्ट्स, शिवास संघ अंतिम फेरीत

फोटो प्रातिनिधीक आहे.

Next

मुंबई दि. २२ :- मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाने पुरस्कृत केलेल्या आणि मुंबई शहर कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या व्यावसायित व्दितीय श्रेणी पुरुषांत टी.बी.एस. स्पोर्ट्स, शिवास इंटरप्रायझेस यांनी अंतिम फेरीत धडक दिली. तर सचिवालय जिमखाना, मुंबई पोष्टल, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस यांनी पुरुष व्यावसायिक प्रथम श्रेणीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सचिवालय जिमखाना विरुद्ध मुंबई पोष्टल आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोलीस अशा उपांत्य लढती होतील.

    नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या व्दितीय श्रेणी व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्य फेरीत टी बी एस स्पोर्ट्सने जय मातादी स्पोर्ट्सचा प्रतिकार ३८-२४ असा मोडीत काढत अंतिम फेरीत धडक दिली. मध्यांतराला १९-१४ अशी आघाडी घेणाऱ्या टीबीएसने उत्तरार्धात देखील तोच जोश कायम ठेवत हा विजय साकारला. रोहित ओक, जितेश पाटील टीबीएस कडून, तर ओमकार पवार, गौरव मानस उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवास इंटरप्रायझेसने वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल्सला २९-२७ असे चकवीत अंतिम फेरी गाठली. मध्यांतराला १२-१५ असे पिछाडीवर पडलेल्या शिवासने आकाश बर्गे, चांदसाब बागी यांच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर ही बाजी पलटविली. वैभव टूर्सच्या स्वप्नील खंडाळे, दीपक घुगरे यांचा खेळ उत्तरार्धात बहरला नाही. त्यामुळे वैभव टूर्सला पराभवाचा सामना करावा लागला.

   प्रथम श्रेणी व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत सचिवालय जिमखान्याने आयकर विभागाचा ३१-२७ असा पराभव करीत प्रथम उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळविला. संदीप इंदुलकर, रोहित कदम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विश्रांतीला १५-०८ अशी आघाडी घेणाऱ्या सचिवालय जिमखन्याला विश्रांतीनंतर मात्र आयकरच्या मयूर खामकर, विजय दिवेकर यांनी कडवी लढत देत सामन्यातील चुरस वाढविली. पण संघाचा विजय मात्र दूरच राहिला. दुसऱ्या सामन्यात मुंबई पोष्टलने रिझर्व्ह बँकेला ४०-१५असे बुकलून काढले. पहिल्या डावात २२-०४ अशी आघाडी घेणाऱ्या पोष्टलने दुसऱ्या डावात देखील सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. रोशन परब, मकरंद मसुरकर यांच्या चतुरस्त्र चढाई-पकडीच्या खेळलेल्या या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बँकेकडून सर्वेश पांचाळ, साहिल राणे बरे खेळले. भारत पेट्रोलीयमने अटीतटीच्या लढतीत साई सिक्युरिटीला २८-२६ असे नमवित उपांत्य फेरीत आगेकूच केली. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यांतराला पेट्रोलियम संघ ०९-१०अशा १ गुणांनी पिछाडीवर पडला होता. पण उत्तरार्धात ओमकार सपकाळ, निखिल पवार यांनी संयमी व धुर्त खेळ करीत संघाचा विजय साजरा केला. सिद्धांत बोरकर, शुभम वर्मा यांचा खेळ साई सिक्युरिटीचा पराभव टाळण्यात कमी पडला. शेवटच्या सामन्यात मुंबई पोलीस संघाने जानकी रामचंद्र स्पोर्ट्सवर ३५-१९ असा विजय मिळविला. विनय म्हात्रे, प्रतीक जाधव यांनी आक्रमक सुरुवात करीत जानकी रामचंद्र स्पोर्ट्सला पूर्वार्धात १८-१६अशी दोन गुणांची आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना राखता आली नाही. उत्तरार्धाच्या खेळात तन्मय सावंत, मधुकर गर्जे, तुषार टिकले यांनी कमबॅक करीत मुंबई पोलिस संघाला विजय मिळवून दिला.

    कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात न्यू परशुराम क्रीडा मंडळाने जय भारत क्रीडा मंडळाचा विरोध ४५-२७ असा मोडून काढत प्रथम अंतिम फेरीत जाण्याचा मान पटकाविला.  शुभम आणि ओमकार या धनावडे बंधूनी सुरुवातीपासून आक्रमक चढाई-पकडीचा खेळ करीत विश्रांतीला २९-०६ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. पण उत्तरार्धात जय भारतच्या आकाश केसरकर, राज आर्य यांनी टॉप गिअर टाकत सामन्यात रंगत भरली. तरी देखील विजयाच्या समीप देखील त्यांना पोहचता आले नाही. दुसऱ्या सामन्यात विजय नवनाथ क्रीडा मंडळाने श्री राम क्रीडा विश्वस्त मंडळाचा ५०-१४ असा धुव्वा उडवित अंतिम फेरीत धडक दिली. हर्ष लाड, दीप बोर्डवेकर, प्रथमेश दहीबावकर यांच्या झंजावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

 

Web Title: Kabaddi: TBS Sports, Shivas team in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.