कबड्डी स्पर्धा : आकाश मंडळ आणि स्वराज्य मंडळ अंतिम फेरीत भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:50 PM2019-11-18T21:50:48+5:302019-11-18T21:52:11+5:30

उपांत्य सामन्यात आकाश क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचे खडतर आव्हान २९-३४ असे संपवित दिमाखात प्रथम अंतिम फेरी गाठली.

Kabaddi Tournament: Akash Mandal and Swarajya Mandal will meet in the final | कबड्डी स्पर्धा : आकाश मंडळ आणि स्वराज्य मंडळ अंतिम फेरीत भिडणार

उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात स्वराज्य क्रीडा मंडळाच्या याशिका पुजारीची अयशस्वी पकड करताना आराध्य सेवा संघाची अर्चना सहानी.

googlenewsNext

मुंबई उपनगर कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या “ उपनगर जिल्हा अजिंक्यपन निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” किशोरी गटात आकाश क्रीडा मंडळ विरुद्ध स्वराज्य क्रीडा मंडळ अशी अंतिम लढत होईल. तर किशोर गटात स्वयंभू,  बालमित्र, गणेश, संकल्प, सिद्धार्थ यांनी आपली विजयी दौड कायम राखली. नेहरू नगर कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा आज तिसरा दिवस. आज किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात आकाश क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचे खडतर आव्हान २९-३४ असे संपवित दिमाखात प्रथम अंतिम फेरी गाठली.

गेली कित्येक वर्षे चेंबूर हा मुलींच्या गटातील बलाढ्य संघ. त्यांनी खेळही तसाच केला. प्रांजल पवार, मयुरी जाधव यांनी सुरुवातच एवढी जोरदार केली की पहिल्या डावात २१-०८ अशी भक्कम आघाडी चेंबूर संघाला मिळवून दिली. पण दुसरऱ्या डावात मात्र त्यांना हा जोश राखणे जमले नाही. आकाश मंडळ काही या भक्कम आघाडीने खचले नाही. दुसऱ्या डावात आकाशच्या आकांक्षा बने, हर्षा पाटील यांना चांगला सूर सापडला. आकांक्षाने चढाईत गुण टिपत, तर हर्षाने धाडशी पकडी करीत संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. शिवाय अंतिम फेरीतही धडक दिली.

   दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्वराज्य क्रीडा मंडळाने आराध्य सेवा संघाला ४३-४२असे चकवीत अंतिम फेरी गाठली. याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांनी आक्रमक सुरुवात करीत स्वराज्यला विश्रांतीला २६-२३ अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात सावध व संयमी खेळ करीत ती आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. उत्तरार्धात हरजित कौर, अर्चना साहनी यांनी धारदार आक्रमण करीत ही आघाडी कमी करून संघाला विजयी करण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण वेळेचे गणित संपल्यामुळे १गुणांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  या अगोदर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वराज्य मंडळाने संघर्ष मंडळाचा ३३-०७; आराध्य संघाने गोरखनाथ संघाचा ३९-२३; चेंबूर क्रीडा केंद्राने सत्यम सेवांचा ३०-२३; आकाश स्पोर्टसने नवशक्तीचा २६-०८ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती.

  किशोर गटाच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत स्वयंभू क्रीडा मंडळाने ५-५ चढायांच्या डावात मातामहाकाली मंडळाचा ३५-३४ (७-६) असा पाडाव करीत झोकात तिसरी फेरी गाठली. सागर मानेच्या झंजावाती खेळाच्या जोरावर स्वयंभू मंडळाने पूर्वार्धात १७-१४ अशी आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात माता महाकालीच्या वेदांत नारकरने चौफेर खेळ करीत पूर्ण डावात स्वयंभुला २८-२८ अशा बरोबरीत रोखले. पण या बरोबरीचे रूपांतर त्या विजयात करता आले नाही. ५-५ चढायांच्या डावात त्यांना १ गुणाने पराभव पत्करावा लागला. गणेश क्रीडा मंडळाने अस्तित्व स्पोर्ट्सला ३३-३२ असे चकवीत आपली विजयी दौड सुरूच ठेवली. मयूर जागडे, अश्विन घाटगे यांनी पूर्वार्धात गणेश मंडळाला १४-१३ अशी आघाडी मिळवून दिली. शेवटी विजयासाठी हीच आघाडी त्यांच्या कामी आली.  अस्तित्वाच्या आदर्श चौरसिया, प्रथमेश शिंदे यांनी उत्तरार्धात चतुरस्त्र खेळ करीत कडवी लढत दिली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ते थोडे कमी पडले. सिद्धार्थ क्रीडा मंडळाने चुरशीच्या लढतीत ओम साई क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३६ – २९ असा मोडून काढला. अमित फुटके, विवेक शर्मा सिध्दार्थकडून, तर वैभव मोरे, मनोज दूड ओम साई संघाकडून छान खेळले. बालमित्र क्रीडा मंडळाने कोकण रत्न मंडळाचा ३१-२२ असा तर संकल्प प्रतिष्ठानने युवक क्लबचा ३६-२९असा पराभव करीत आपली आगेकूच सुरू ठेवली.

Web Title: Kabaddi Tournament: Akash Mandal and Swarajya Mandal will meet in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.