क्रिकेटपेक्षाही कबड्डी लोकप्रिय ठरेल : राकेश
By admin | Published: September 14, 2016 05:09 AM2016-09-14T05:09:30+5:302016-09-14T05:09:30+5:30
कबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे
जयंत कुलकर्णी, औरंगाबाद
कबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत क्रिकेटपेक्षाही कबड्डी हा खेळ जास्त लोकप्रिय ठरेल, असा विश्वास कबड्डीचा आघाडीचा खेळाडू राकेश कुमार याने ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
परभणी येथे मंगळवारपासून मराठवाडास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तो औरंगाबादेत विमानतळावर आल्यानंतर त्याने हा विश्वास व्यक्त केला. निजामपूरस्थित राकेश कुमार याची खेळाडू आणि कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय आहे. २००४ आणि २००६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावून देणाऱ्या कबड्डी संघात त्याने निर्णायक योगदान दिले होते. त्याचप्रमाणे त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. मंगळवारी औरंगाबादेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना एक ओळख मिळाली असल्याचे राकेश कुमार याचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘याआधी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलो, तरी आम्हाला कोणी ओळखत नव्हते; परंतु प्रो-कबड्डी सुरू झाल्यापासून या खेळाला एक नवीन वलय मिळाले. लोकांमध्ये आमची विशेष ओळख निर्माण झाली आहे. कबड्डी खेळात विशेषत: ग्रामीण आणि मध्यमवर्गीय भागातील खेळाडू असतात. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना आर्थिकदृष्ट्याही मदत झाली आहे आणि त्यामुळेच हा खेळ आता एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. यात फेडरेशनचेही योगदान निश्चित महत्त्वाचे आहे. आता प्रत्येक पालकाचाही ओढा आपला मुलगा कबड्डी खेळावा याकडे वाढला आहे.’’