कर्बरचा ऐतिहासिक पराभव
By admin | Published: May 29, 2017 12:40 AM2017-05-29T00:40:11+5:302017-05-29T00:47:29+5:30
जर्मनीची एंजेलिक कर्बर रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव स्वीकारणारी पहिली अव्वल मानांकित महिला खेळाडू ठरली
पॅरिस : जर्मनीची एंजेलिक कर्बर रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव स्वीकारणारी पहिली अव्वल मानांकित महिला खेळाडू ठरली आहे तर चाकूहल्ल्यातून बचावल्यानंतर पुनरागमन करताना पेत्रा क्विटोव्हाने शानदार सलामी दिली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कर्बरला रशियाच्या इकटेरिना मकारोव्हाविरुद्ध ६-२, ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला. ओपन युगात प्रथमच अव्वल मानांकित महिला खेळाडूला रोला गॅरोवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फ्रेंच ओपनमध्ये झटपट गाशा गुंडाळणाऱ्या अव्वल मानांकित खेळाडूंमध्ये जस्टिन हेनिन (२००४) व सेरेना विलियम्स (२०१४) यांचा समावेश आहे.
कर्बरने गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन व यूएस ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते तर विम्बल्डनमध्ये ती उपविजेती होती, पण रोला गॅरोच्या लाल मातीवर मकारोव्हाविरुद्ध मात्र तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्बरने पहिल्या सेटमध्ये केवळ चार विनर लगावले आणि १२ टाळण्याजोग्या चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्ये मकारोव्हाने सुरुवातीलाच ३-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर कर्बरने काही चांगले फटके मारत सूर गवसल्याचे संकेत दिले. त्यानंतर मकारोव्हा सामना जिंकण्यासाठी सर्व्हिस करीत असताना कर्बरला सातवेळा ब्रेक पॉर्इंटची संधी मिळाली, पण त्यावर तिला गुण नोंदविता आला नाही. महिला विभागात सेरेना विलियम्सन, मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अजारेंका यांच्यासारख्या अव्वल खेळाडू सहभागी न झाल्यामुुळे आणि कर्बर पहिल्याच फेरीत गारद झाल्यामुळे अन्य खेळाडूंना जेतेपद पटकावण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या खेळाडूंमध्ये दोनदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या क्वितोव्हाचाही समावेश आहे. क्वितोव्हाने अमेरिकेच्या ज्युलिया बोसरपचा ६-३, ६-२ ने पराभव केला. क्वितोव्हावर डिसेंबर महिन्यात चेक प्रजासत्ताकमधील तिच्या निवासस्थानी एका दरोडेखोराने चाकूने हल्ला केला होता. त्यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. आज पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर २७ वर्षीय क्वितोव्हाच्या डोळ्यात अश्रू तराळले. क्वितोव्हा हल्ल्यामध्ये हाताला झालेल्या दुखापतीबाबत बोलताना म्हणाली,‘मी आज विजय मिळविला असला तरी मला माहिती आहे की मी यापूर्वीच जिंकलेली आहे.’ आॅलिम्पिक चॅम्पियन मोनिका पुइग दुहेरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. प्युतेरिकाच्या या खेळाडूने ३१ व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीची झुंज ६-३, ३-६, ६-२ ने मोडून काढली. ३० व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या टिमिया बासिनस्कीने स्पेनच्या सारा सोरिबेसचा ६-१, ६-२ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या मेडिसन बें्रगलने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जचा तीन तास रंगलेल्या लढतीत १-६, ६-३, १३-११ ने पराभव केला.
पुरुष विभागात १९ व्या मानांकित स्पेनच्या अल्बर्ट रामोसने रोमानियाच्या मारियस कोपिलचा ६-७, ६-१, ६-४, ६-२ ने पराभव केला. लक्समबर्गच्या २६ व्या मानांकित जाइल्स मुलर व अर्जेंटिनाचा बिगरमानांकित होरासियो जेबालोस हे खेळाडूही दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)