कलमाडी, चौटाला यांची नियुक्ती रद्द; क्रीडा मंत्रालयाकडून स्वागत

By admin | Published: January 11, 2017 01:44 AM2017-01-11T01:44:19+5:302017-01-11T01:44:48+5:30

चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर दोषी सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी झालेली नियुक्ती भारतीय आॅलिम्पिक संघटनेने

Kalmadi, Chautala's appointment canceled; Welcome from Sports Ministry | कलमाडी, चौटाला यांची नियुक्ती रद्द; क्रीडा मंत्रालयाकडून स्वागत

कलमाडी, चौटाला यांची नियुक्ती रद्द; क्रीडा मंत्रालयाकडून स्वागत

Next

नवी दिल्ली : चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर दोषी सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी झालेली नियुक्ती भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) मंगळवारी अखेर रद्द केली. या निर्णयामुळे क्रीडा मंत्रालयाची मान्यता बहाल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आयओएच्या निर्णयाचे क्रीडा मंत्रालयाने स्वागत केले आहे.
कलमाडी आणि चौटाला यांची नियुक्ती तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी ‘कारणे दाखवा’ नोटिसीला उत्तर देताना स्पष्ट केले. क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास म्हणाले,‘ आयओएने घटनेचे पालन करीत दोषी लोकांना हटविल्याच्या निर्णयाचे मंत्रालय स्वागत करते. क्रीडा मंत्रालयाची मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या संभाव्य कारवाईपासून बचाव करण्यासाठी आयओएने दोन्ही नियुक्त्या रद्द केल्या.’
कलमाडी, चौटाला या दोघांना २७ डिसेंबर रोजी चेन्नई येथील आमसभेदरम्यान आयओएने मानद पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. आयओएतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा या नियुक्तीला विरोध होता. यामुळेच आयओएला हा निर्णय आज अखेर मागे घेणे भाग पडले. विरोधानंतर आपली प्रतिमा स्वच्छ होईपर्यंत आणि दोषमुक्त होईस्तोवर कलमाडी यांनी कुठलेही पद न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला. चौटाला यांनीदेखील आयओसीची हरकत असेल तर मी मागे हटणार,असे जाहीर केले होते.
मंत्रालयाने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देत रामचंद्रन यांनी लिहिले,‘आयओएची मान्यता रद्द करण्यात आल्याची घटना दुर्दैवी आहे. आमची बाजू ऐकून न घेताच एकतर्फी निर्णय झाला. आमसभेत दोन आजीवन अध्यक्ष नियुक्तीचा प्रस्ताव होता पण आम्ही प्रस्ताव स्वीकारला असा याचा अर्थ होत नाही. आमसभेच्या अखेरीस एका सदस्याने दोन आजीवन अध्यक्ष असावेत अशी सूचना केली. घटनेतील कलम ७ नुसार किमान सात दिवस आधी कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळेच प्रस्तावावर मतदान झाले नाही शिवाय पारितही करण्यात आला नाही. प्रस्ताव घटनेनुसार नसल्यामुळे संबंधित व्यक्ती आयओए सदस्य, पदाधिकारी सर्वांना लाजीरवाण्या स्थितीस सामोरे जावे लागले. त्यासाठी खेद व्यक्त करतो.’
कलमाडी हे २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनात झालेल्या भ्रष्टाचारात आरोपी आहेत. ते नऊ महिने कारागृहात होते. चौटाला यांच्याविरुद्ध अपसंपदा लपविल्याचा गुन्हा दाखल आहे. (वृत्तसंस्था)

क्रीडा संघटनांसोबत ‘पंगा’ नाही: गोयल
नवी दिल्ली : सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांच्या आजीवन अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय मागे घेणाऱ्या आयओएच्या निर्णयाचे स्वागत करीत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी क्रीडा संघटनांसोबत ‘पंगा’ घेणे आमचे काम नाही, असे स्पष्ट केले आहे. भारताला क्रीडाराष्ट्र बनविण्यासाठी आयओएला सोबत घेत काम करणार असल्याचे सांगून गोयल म्हणाले,‘आयओएने स्वत:ची चूक सुधारली याचा आनंद वाटतो. सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. क्रीडासंहिता समितीच्या शिफारशींवर काम करण्याचा सर्वांचा हेतू सफल व्हावा, हा मुख्य हेतू आहे.’

Web Title: Kalmadi, Chautala's appointment canceled; Welcome from Sports Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.