आश्विनच्या जाळ्यात कांगारू
By admin | Published: March 8, 2017 01:37 AM2017-03-08T01:37:06+5:302017-03-08T01:37:06+5:30
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या झुंजार वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या फिरकीपुढे आॅस्ट्रेलियन फलंदाज नतमस्तक झाले.
बंगळुरू : चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या झुंजार वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या फिरकीपुढे आॅस्ट्रेलियन फलंदाज नतमस्तक झाले. भारताने आज चौथ्या दिवशी मंगळवारी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ७५ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
गेल्या काही दिवसांपासून सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या आश्विनने ४१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. भारताने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा डाव ३५.४ षटकांत ११२ धावांत संपुष्टात आला. आश्विनने कारकिर्दीत २५व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली.
वेगवान गोलंदाज उमेश यादवने भेदक मारा करताना ३० धावांच्या मोबदल्यात दोन, तर ईशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. जडेजाने ८ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ३ धावा दिल्या.
आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार स्टीव्हन स्मिथ (२८) व पीटर हँड््सकोंब (२४) यांना २०पेक्षा अधिक धावा फटकावता आल्या. आॅस्ट्रेलिया संघाने अखेरच्या सहा विकेट केवळ ११ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्यापैकी पाच विकेट आश्विनने घेतल्या.
आॅस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना ३३३ धावांनी जिंकला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासून भारत बॅकफूटवर होता. पण सोमवारी अखेरच्या सत्रात पुजारा (९२) व रहाणे (५२) यांनी पाचव्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी करीत यजमान संघाला वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतर गोलंदाजांनी आज, मंगळवारी विजयाचा कळस चढविला.
त्याआधी, कालच्या ४ बाद २१३ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा दुसरा डाव जोश हेजलवूड (६-६७) व मिशेल स्टार्क (२-७४) यांच्या भेदक माऱ्यापुढे ९७.१ षटकांत २७४ धावांत संपुष्टात आला. पुजारा व रहाणे यांनी महत्त्वाची भागीदारी करीत सामन्यात चुरस कायम राखली. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर भारताचा डाव झटपट संपुष्टात आला. अखेरच्या सहा विकेट केवळ ३६ धावांत गमावल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. ईशांतने पाचव्या षटकात मॅट रेनशॉला (५) तंबूचा मार्ग दाखवला. डेव्हिड वॉर्नरने (१७) आश्विनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आक्रमक खेळीचे संकेत दिले. पण आश्विनने त्याला पायचित करीत भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार स्मिथ उमेशच्या पहिल्या षटकात नशीबवान ठरला. उमेशच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात कर्णधार विराटला टिपण्यात अपयश आले. त्यानंतर स्मिथने आश्विनच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. दरम्यान, शॉन मार्श (९) कमनशिबी ठरला. उमेशच्या गोलंदाजीवर त्याला मैदानी पंचानी पायचित ठरवले. स्मिथचा (२८) अडथळा उमेशने दूर केला. तो पायचितचा बळी ठरला. हँड्सकोंब व मिशेल मार्श (१३) यांनी पाचव्या विकेटसाठी आक्रमक २७ धावांची भागीदारी केली आणि २६व्या षटकात संघाला धावसंख्येचे शतक गाठून दिले. त्यानंतर कोहलीने गोलंदाजीसाठी आश्विनला पाचारण केले. त्याने मिशेल मार्श व पुढच्या षटकात मॅथ्यू वेडला (०) माघारी परतवत आॅस्ट्रेलियाची ६ बाद १०१ अशी अवस्था केली. आश्विनने चहापानानंतर पहिल्याच षटकात मिशेल स्टार्कला (१) बोल्ड करीत आॅस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. जडेजाने स्टीव्ह ओकिफी (२) याला, तर आश्विनने हँड््सकोंबला माघारी परतवत भारताचा विजय निश्चित केला. त्यानंतर आश्विनने नॅथन लियोनचा (२) स्वत:च्या गोलंदाजीवर झेल टिपत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
धावफलक :
भारत पहिला डाव १८९. आॅस्ट्रेलिया पहिला डाव २७६. भारत दुसरा डाव : लोकेश राहुल झे. स्मिथ गो. ओकिफी ५१, अभिनव मुकुंद त्रि.गो. हेजलवूड १६, चेतेश्वर पुजारा झे. मिशेल मार्श गो. हेजलवूड ९२, विराट कोहली पायचित गो. हेजलवूड १५, रवींद्र जडेजा त्रि.गो. हेजलवूड ०२, अजिंक्य रहाणे पायचित गो. हेजलवूड ५२, करुण नायर त्रि.गो. स्टार्क ००, रिद्धिमान साहा नाबाद २०, रविचंद्रन आश्विन त्रि.गो. हेजलवूड ०४, उमेश यादव झे. वॉर्नर गो. हेजलवूड ०१, ईशांत शर्मा झे. शॉन मार्श गो. ओकिफी ०६. अवांतर (१५). एकूण ९७.१ षटकांत सर्वबाद २७४. बाद क्रम : १-३९, २-८४, ३-११२, ४-१२०, ५-२३८, ६-२३८, ७-२४२, ८-२४६, ९-२५८, १०-२७४. गोलंदाजी : स्टार्क १६-१-७४-२, हेजलवूड २४-५-६७-६, लियोन ३३-४-८२-०, ओकिफी २१.१-३-३६-२, मिशेल मार्श ३-०-४-०.
आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : डेव्हिड वॉर्नर पायचित गो. आश्विन १७,
मॅट रेनशॉ झे. साहा गो. ईशांत ०५, स्टीव्हन स्मिथ पायचित गो. यादव २८, शॉन मार्श पायचित गो. यादव ०९, पीटर हँड््सकोंब झे. साहा गो. अश्विन २४, मिशेल मार्श झे. नायर गो. आश्विन १३, मॅथ्यू वेड झे. साहा गो. आश्विन ००, मिशेल स्टार्क त्रि.गो. आश्विन ०१,
स्टीव्ह ओकिफी त्रि.गो. जडेजा ०२, नॅथन लियोन झे. व गो. आश्विन
०२, जोश हेजलवूड नाबाद ००. अवांतर (११). एकूण ३५.४ षटकांत सर्वबाद ११२. बाद क्रम : १-२२, २-४२, ३-६७, ४-७४, ५-१०१,
६-१०१, ७-१०३, ८-११०, ९-११०, १०-११२. गोलंदाजी : ईशांत
शर्मा ६-१-२८-१, आश्विन १२.४-४-४१-६, यादव ९-२-३०-२,
जडेजा ८-५-३-१.
स्मिथने चूूक कबूल केली
- डीआरएसचा निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रूमकडे मदत मागण्याची चूक केली, अशी कबुली आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. लढत मात्र खिलाडूवृत्तीने खेळली गेली, असेही तो म्हणाला.
- स्मिथच्या कृतीवर माजी खेळाडूंनी टीका केली आहे. या घटनेबाबत सांगताना स्मिथ म्हणाला, गडबडीमध्ये ही कृती घडली.
- स्मिथ पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘चेंडू माझ्या पॅडवर आदळला. मी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाकडे बघितले. त्यानंतर मी पॅडीकडे वळलो. मी तसे करायला नको होते. असे प्रथमच घडले. मी माझ्या सहाकाऱ्यांकडे बघितले. माझ्याकडून ती चूक झाली. घाबरल्यामुळे अशी कृती माझ्याकडून घडली.’
- प्रतिस्पर्धी कर्णधार विराट कोहलीसोबत काहीच वाद झाला नसल्याचे स्मिथने सांगितले.
- स्मिथ म्हणाला, ‘मी आणि विराट थोडी चर्चा करीत होतो. त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. त्यात आनंद मिळाला. एखाद्या वेळी अशी चर्चा करणे चांगले असते.’