कांगारुंची भारतापुढे अग्निपरीक्षा!
By admin | Published: March 26, 2015 01:23 AM2015-03-26T01:23:22+5:302015-03-26T01:23:22+5:30
विश्वचषक दोन पावलांवर असताना टीम इंडियाच्या विजयाचा अश्वमेध आज गुरुवारी उपांत्य लढतीत आॅस्ट्रेलियापुढे उभा असेल.
लक्ष्य फायनलचे : प्रत्येक विभागात सर्वश्रेष्ठ कामगिरीचे टीम इंडियापुढे आव्हान
सिडनी : विश्वचषक दोन पावलांवर असताना टीम इंडियाच्या विजयाचा अश्वमेध आज गुरुवारी उपांत्य लढतीत आॅस्ट्रेलियापुढे उभा असेल. विजयी घोडदौड पुढे दमटायची झाल्यास धोनी अॅन्ड कंपनीला कांगारुविरुद्ध प्रत्येक आघाडीवर सरस कामगिरी करण्याचे कडवे आव्हान राहील.
सहा आठवड्यांआधी उभय संघ कसोटी व त्यानंतर तिरंगी मालिकेत परस्परांविरुद्ध खेळले. त्यात मायकेल क्लार्कच्या संघाने भारताला एकही विजय साकार करू दिला नव्हता. क्रिकेटविश्वात ज्याप्रमाणे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका व भारत-पाक यांच्यातील सामन्यांची चर्चा होते तशीच चर्चा गेल्या काही वर्षांपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांची होत आली आहे. उद्याची लढत डेव्हिड वॉर्नरची फटकेबाजी व मोहम्मद शमीचा वेगवान मारा अशी राहील. मिशेल स्टार्कचे बाउन्सरविरुद्ध विराट कोहलीची शैलीदार फलंदाजी अशी असेल. आर. अश्विनचा ‘कॅरमबॉल’विरुद्ध ग्लेन मॅक्सवेलची आक्रमक फटकेबाजी अशीही असेल. सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील त्या कोहलीवर. त्याने पाकविरुद्ध पहिल्या सामन्यात शतक नोंदविल्यापासून एक अर्धशतकदेखील केले नाही. दडपणात मात्र तो सर्वोत्कृष्ट खेळी करण्यात पटाईत असल्याने ही सर्वोत्तम संधी त्याच्याकडे असेल. सिडनी मैदानावर उभय संघ परस्परांपुढे येतील तेव्हा ही लढत तुल्यबळ राहील. मागच्या कामगिरीचा कुठलाही परिणाम या सामन्यावर होणार नाही. भारताने या स्पर्धेत सलग सात विजयांची नोंद केली, पण आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताने दोन कसोटी, दोन वन डे आणि एक सराव सामना गमावला होता. विश्वचषकातील एका सराव सामन्याचाही यात समावेश आहे. त्या दौऱ्याची उणीव भारताने विश्वचषकात शानदार कामगरीद्वारे भरून काढली.
विश्वचषकापूर्वी दिशाहीन वाटणाऱ्या भारतीय संघाने अचानक मुसंडी मारताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आधी फलंदाजी घ्यावी, असे मत इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉन याच्यासह अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. स्पर्धेचे आता
उरले ते केवळ दोन सामने. अशा वेळी दोन्ही कर्णधारांकडे गमविण्यासारखे बरेच काही आहे. मायकेल क्लार्क वन डेत उपयुक्त ठरू शकेल का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना उद्या सामना जिंकून टीकाकारांची तोंडे बंद करण्याची त्याला संधी राहील. दुसरीकडे विश्वचषकाचा अनुभव असलेल्या धोनीसाठी सलग दोन विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटविश्वात ऐतिहासिक नोंद करण्याची हीच वेळ असेल. (वृत्तसंस्था)
वॉर्नकडून टिप्स...
टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या फिरकीचा यशस्वीरीत्या सामना करता यावा, यासाठी आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी महान माजी गोलंदाज शेन वॉर्न याच्याकडून टिप्स घेतल्या़ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याने वॉर्नला निमंत्रित केले होते़ सराव सत्रादरम्यान क्लार्क आणि वॉर्न बराच वेळ चर्चा करताना दिसले़
माझा वन डे रेकॉर्ड चांगला
विश्वचषकात फारशी चमक न दाखविल्याने टीकेचा सामना करीत असलेला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने आपला वन डे रेकॉर्ड इतरांसारखाच चांगला असल्याचे म्हटले आहे. २४३ वन डेत ७८९७ धावा काढणाऱ्या क्लार्कने विश्वचषकाच्या चार सामन्यांत केवळ १३५ धावा केल्या. संघात तुझा समावेश झाल्याने संतुलन बिघडले का, असा सवाल करताच क्लार्क म्हणाला,‘‘स्वत:चे मत मांडण्याचा कुणालाही हक्क आहे. मी २०० सामने खेळलो. माझ्या मते प्रत्येकाने स्वत:शी माझी तुलना करण्याचे ठरविले असावे.
आम्ही कुठेही जिंकू शकतो
सिडनीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. पण, रोहित शर्मा याने टीम इंडिया कुठल्याही खेळपट्टीवर जिंकण्याची ताकद बाळगते, असे म्हटले आहे. सिडनीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक असेल, या तर्कात दम नसल्याचे सांगून रोहित म्हणाला, की ही खेळपट्टी वेगवान किंवा फिरकीला पूरक असली, तरी आम्हाला त्यामुळे फरक पडणार नाही. ही खेळपट्टी कोरडी आणि सपाट दिसते.
यजमानांसाठी डोकेदुखी
आॅस्ट्रेलियासाठी मोठी डोकेदुखी सिडनी खेळपट्टीची असेल. ही खेळपट्टी यजमान संघासाठी कधीही लाभदायी ठरलेली नाही व क्वार्टरफायनलमध्ये द. आफ्रिकेने लंकेला पराभूत केले होते. इम्रान ताहिरने चार आणि डुमिनीने तीन गडी बाद केले होते. हा अनुभव लक्षात घेता जडेजा व आश्विन आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडू शकतात.
सिडनी मैदानाविषयी
४न्यू साऊथ वेल्स (मुरे पार्क) येथे मैदान.
४4402 आसनक्षमता.
४150.0 मी. लांबी, 150.0 मी. रुंदी.
४ फ्लडलाईटची व्यवस्था
४इंड नावे : पॅडिगोटन इंड, रँडविक इंड.
४ या मैदानावर सध्या शेवटची कसोटी आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ६
ते १० जानेवारी २०१५ दरम्यान झाली. ती अनिर्णीत राहिली. भारताकडून केएल राहुल आणि विराट कोहलीची शतके ही जमेची बाजू राहिली.
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), रवीचंद्रन आश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, रोहित शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव
आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हीड वॉर्नर, अॅरोन फिंच, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी.
विराट श्२ जॉन्सन
कोणत्याही मालिकेआधी आणि मालिकेत विरोधी संघातील इनफॉर्म बॅट्समनला शब्दांनी टार्गेट करणे हा आॅस्ट्रेलियन माइंड गेम असतो. नुकत्याच झालेल्या भारतविरोधी कसोटी आणि तिरंगी मालिकेत विराट कोहलीला आॅस्ट्रेलियन्सनी लक्ष्य केले होते. यात आघाडीवर होता तो मिशेल जॉन्सन. विराटही तितकाच आक्रमक.
त्यानेही ‘ईट का जबाब पत्थर’ने दिला. म्हणून तो कसोटी मालिकेत बॅटने आणि तोंडाने त्यांना पुरून उरला. या सिरीयलमधील शेवटचा अॅपिसोड आज सिडनीत पाहायला मिळेल. तसे संकेत आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी दिले आहेत. भारतीय संघातील सर्वच खेळाडू मॅचविनर आहेत, पण विराट तर या सर्वांत पुढे आहे. तो चालला, तर कांगारूंचे वर्ल्डकपमधील ‘पॅक अप’ नक्की.
म्हणून त्याला लवकर गुंडाळण्याचे आॅस्ट्रेलियाचे प्रयत्न असतील. जॉन्सनवरच ही खास कामगिरी असेल. त्याचे बाउन्सर आणि बीमर तर विराटला झेलावेच लागतीलच, शिवाय ‘स्लेजिंग’चे अग्निबाणही सोसावे लागतील. या परिस्थितीत डोके शांत ठेवून केवळ बॅटने उत्तर देणे हेच विराटसाठी योग्य होईल.
मॅक्सवेल श्२ आश्विन
आयपीएलचा मिलेनियर बॉय ग्लेन मॅक्सवेल आता यंदाच्या वर्ल्डकपमधील घातक फलंदाज बनला आहे. मैदानाच्या कोणत्याही भागात हव्या त्या पद्धतीने तो फटकेबाजी करू शकतो. क्षेत्ररक्षणातील नव्या नियमामुळे त्याच्या फलंदाजीला आणखी धार आली आहे.
तो फलंदाजीस येईल तेव्हा आश्विनचा वापर करण्याची रणनीती धोनी अवलंबण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेचा सामना वगळता आश्विन हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. फिरकीपुढे मॅक्सवेलचे तंत्र थोडे उघडे पडते. हीच उणीव हेरून त्याला घेरण्यासाठी आश्विनाला आपला सगळा अनुभव पणाला लावावा लागेल.
स्ट्रेंग्थ आणि वीक पॉइंट
स्ट्रेंथ : वर्ल्डक्लास फलंदाजांची भक्कम फळी ही भारताची नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. धवन, रोहित आणि विराट यापैकी कोणतेही दोघे जण खेळपट्टीवर टिकले, तर धावडोंगर बघता-बघता उभा राहतो. धावांचा पाठलाग करायची वेळ आली, तर रैना रहाणे आणि धोनी यांच्यासारखे सर्वोत्कृष्ट फिनिशर हे काम लिलया पार पाडतात. भारतीयाची गोलंदाजी सध्या पूर्ण बहरात आहेत. शमी, यादव आणि मोहित या जलदगती त्रिकुटासह भारताकडे आश्विन, जडेजा यांसारखे दर्जेदार स्पीनर आहेत. शिवाय रैना, रोहित हे पार्टटाईमरसुद्धा चांगली भूमिका वठवू शकतात.
विक पॉइंट : जलदगतीने शरीराच्या दिशेने येणारे बाउन्सर हे भारतीय फलंदाजी खिळखिळी करू शकतात. उसळते चेंडू टाकून भारतीय फलंदाजांना त्रस्त करण्याची रणनीती आॅस्ट्रेलियन संघाची असेल. सुरुवातीला विकेट गेल्या, तर भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवता येतो.
स्ट्रेंथ : दर्जेदार जलदगती गोलंदाज ही आॅस्ट्रेलियाची नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, हेजलवूड हे नियमित गोलंदाज आणि वॉटसन, मॅक्सवेल, तसेच फॉल्कनेर हे अष्टपैलू संघाला बळकटी प्रदान करतात. वॉर्नर, फिंच यांची सलामीची जोडी चांगली सुरुवात करून देऊ शकते.
विक पॉइंट : चांगल्या गोलंदाजीसमोर आॅस्ट्रेलियन फलंदाज गडबडतात, ही गोष्ट पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्पष्ट झाली आहे. भारताकडे वहाब रियाजसारखे १५0च्या गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज नसले, तरी शमी, यादव हे स्पर्धेत बाउन्सरचा योग्य वापर करण्यात यशस्वी ठरे आहेत. महत्त्वाचे म्हणजे फिरकीपुढे आॅस्ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडते, हे सर्वश्रुत आहे.
कर्णधारांची विजयाची कामगिरी
महेंद्रसिंह धोनी
भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आजमितीला जगातील सर्वांत बुद्धिमान कर्णधार म्हणून गणला जातो. दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजयाची शंभरी साजरी केली आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी डोके शांत ठेवून आपल्या कामावर कॉन्सनट्रेट कसे करावे, हा त्याचा अंगभूत गुण त्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे.
तो स्वत: चांगली कामगिरी करतो. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते. सहकाऱ्यांमध्ये त्याचा धाकही आहे, आदरही आहे. फिनिशर म्हणून तो हार्डहिंटिंगही करू शकतो, तसा प्रतिकूल खेळपट्टीवर एकेरी-दुहेरी धावांनी पोतडी भरतो. यष्टीमागे त्याची कामगिरी तर लाजवाब अशीच आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने १७७ वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी शंभर जिंकले आहेत, तर ६२ हरले आहेत. चार सामने टाय झाले आहेत, तर ११ सामन्यांचा निर्णय लागला नाही. त्याच्या विजयाची टक्केवारी ६१ इतकी आहे. ही आकडेवारी त्याची महती सांगण्यास पुरेशी आहे.
मायकेल क्लार्क
विक्रमी कर्णधार रिकी पाँटिंगचा वारसदार म्हणून आॅस्ट्रेलियन संघाची सूत्रे सांभाळणाऱ्या मायकेल क्लार्कची कारकीर्द दुखापतीने ग्रासली आहे. पाठदुखीमुळे त्याला अनेक मालिकेतून आपला सहभाग काढून घ्यावा लागला आहे. अगदी वर्ल्डकप तोंडावर असतानाही पाठदुखीने त्याची पाठ सोडली नव्हती. स्पर्धेतील पहिले दोन सामने तो खेळू शकला नव्हता.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून त्याने पुनरागमन केले आहे. त्याच्यामुळे मधल्या फळीला मजबुती आली आहे. खेळपट्टीवर स्थिरावण्यास तो थोडा वेळ घेतो, पण नंतर तो घातक ठरू शकतो.
यंदाचा वर्ल्डकप जिंकून आपण पाँटिंग, स्टिव्ह वॉ यांच्या परंपरेचा पाईक असल्याचे सिद्ध करून दाखवण्याची संधी त्याला आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आॅस्ट्रेलियाने ७२ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४८ जिंकले आहेत. २१ सामने गमावले आहेत, तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे.
सिडनी स्टेडियमवर ६५ टक्के भारतीय चाहते
आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीसाठी सिडनी स्टेडियमची ६५ टक्के तिकिटे भारतीय चाहत्यांनी विकत घेतली आहेत. त्यामुळे बुधवारी स्टेडिममध्ये फक्त तिरंगा फडकताना आणि निळे जल्लोष पाहायला मिळणार आहे.
ट्विटर : भारत विरुद्धच्या लढतीची भारतीय प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे कळाल्यावर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लर्कने ट्विटरवर आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेटप्रेमींना जास्तीत जास्त संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जावईबापूंसाठी ‘ते’ सुटी घेणार
बागपत : भावी जावईबापू सुरेश रैना आणि टीम इंडियाची विश्वचषकात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याच्या बामनोली गावातील नागरिक कामातून सुटी घेणार आहेत. भारताचा विजय आणि त्यात रैनाची कामगिरी शानदार व्हावी यासाठी गावातील हनुमान मंदिरात पूजा करण्यात आली. सामन्याचा आनंद लुटण्यासाठी गाव पंचायतने मोठा टीव्ही स्क्रिन उभारला. याच गावातील प्रियंका चौधरी हिच्याशी रैनाचा विवाह होणार आहे. जावईबापूंची कामगिरी जवळून पाहता यावी यासाठी कुणीही शेतात जाणार नाही. शेतमजूर व नोकरदार सुटी घेतील, असा पंचायतने कालच्या बैठकीत निर्णय घेतला. याशिवाय दुसऱ्यांदा विश्वचषक जिंंकल्यास गावभोजन देण्यात येईल, असा निर्णय देखील झाला.
नंबर गेम
1 भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सामना जिंकला आहे. आतापर्यंत उभय देशांत १३ सामने या मैदानावर झाले. या मैदानावरील भारताचा जिंकण्याचा आणि पराभूत होण्याचा रेशो ०.०८३ असा आहे.
10.3भारताचे आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजय-पराजयाचे रेकॉर्ड राहिले आहे. आॅस्ट्रेलियामध्ये भारताचा विजय-पराजयाचा रेशो ०.३३ राहिला आहे. तो दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त आहे. आफ्रिकेतील भारताचा रेशो ०.२४ राहिला असून, पाच सामने जिंकलेत, २१ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.
1-1 भारताचे विश्वचषकातील बाद फेरीतील आॅस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड आहे. २००३ मध्ये भारताने अंतिम फेरीत पराभव स्वीकाराला होता. तर, २०११ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताने आॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते. भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हेच एकमेव संघ आॅस्ट्रेलियाला बाद फेरीत पराभूत करणारे देश आहेत.
8-2असे रेकॉर्ड सिडनी क्रिकेट मैदानावर आॅस्ट्रेलियाचे राहिले आहे. यापूर्वी दोन्ही पराभव हे लंकेकडून त्यांना स्वीकारावे लागले. येथे द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड हे संघ येथे पराभूत झालेले आहेत.
1-9असे दिवस-रात्र सामन्यांत जय-पराजयाचे रेकॉर्ड सिडनी क्रिकेट मैदानावर राहिले आहे. साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध ३७६ आणि दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध ४०८ धावा केल्या होत्या. २०१२ मध्ये भारताला आॅस्ट्रेलियाने २५२ धावांचे आव्हान दिले होते, तरीही भारत ८७ धावांनी पराभूत झाला.
165 धावांची सलामी विश्वचषकात आॅस्ट्रेलियाच्या सलामीच्या
जोडीने दिली आहे. सहा सामन्यांत एकदाच अर्धशतकी भागिदारी नोंदविली आहे. त्यांची सरासरी ४२.७५ असून, त्यात दोन शतकांचा समावेश आहे. मात्र, दोन डावांत त्या दोघांनी ३१३ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नने अफगाणिस्तानविरुद्ध १७८, अॅरोन फिंचने इंग्लंडविरुद्ध १३५ धावा केल्या. मात्र, १० डावांत या जोडीने २० च्या सरासरीने २०० धावा केल्या आहेत. त्यात ४७ ची सरासरी स्कॉटलंडविरुद्ध सर्वाधिक ठरली.
18.14 अशा सरासरीने भारताच्या सलामीच्या जोडीने १४ डावांत या मैदानावर धावा केल्या आहेत. त्यात केवळ दोन अर्धशतकी भागिदारीचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि रॉबिन उथाप्पा यांनी २००८ मध्ये असा खेळ केला होता. मात्र, २००४ मध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने मेलबॉर्न क्रिकेट मैदानावर १०३ धावांची सलामी दिली होती.
81.92अशी सरासरी भारतीय फलंदाजांनी ११ ते ४० या षटकांत विश्वचषकात ठेवली आहे. त्यानंतर श्रीलंकेची वर्णी लागते. त्यांची सरासरी ४९.९१ राहिली. भारताची प्रतिषटकामागे ५.७६ असा रनरेट राहिला आहे. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाचा ६.४९ अशा रनरेटने धावा केल्या आहेत. शिवाय त्यांची एका गडीमागे ४८.३६ सरासरी राहिली आहे.
भारताच्या साखळीतील लढती
७६ धावांनी विजय विरुद्ध पाकिस्तान
१३0 धावांनी विजय विरुद्ध दक्षिण आफ्रिका
०९ विकेट विजय विरुद्ध युएई
४ विकेट विजय विरुद्ध वेस्ट इंडिज
८ विकेट विजय विरुद्ध आर्यलंड
६ विकेट विजय विरुद्ध झिब्म्बोंबे
बाद फेरीतील सामना
बांगलादेश विरुद्ध १0९ धावांनी विजयी
आॅस्ट्रेलिया साखळीतील लढती
१११ धावांनी इंग्लड विरूद्ध विजय
बांगलादेश विरूद्ध पावसामुळे सामना रद्द
१ विकेटने न्यूझीलंडकडून पराभूत
२७५ धावांनी आफिगस्तानीविरूद्ध विजय
६४ धावांनी श्रीलंकाविलद्ध विजयी
७ विकेटने स्कॉटलंडविरूद्ध विजय
बाद फेरीतील सामना
६ विकेटने पाकिस्तानविरूद्ध विजय