कांगारूंनी मुंबईत गाळला घाम
By admin | Published: February 16, 2017 12:16 AM2017-02-16T00:16:56+5:302017-02-16T00:16:56+5:30
आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या बलाढ्य भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया संघ सज्ज
मुंबई : आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या बलाढ्य भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया संघ सज्ज असून, त्यांनी बुधवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर घाम गाळला. २३ फेब्रुवारीपासून पुणे येथून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी आॅस्टे्रलियन संघ मुंबईत सराव सामना खेळेल.
सोमवारी मुंबईत आगमन झालेल्या आॅस्टे्रलिया संघाने ब्रेबॉन स्टेडियमवर आपल्या पहिल्या सराव सत्रात कसून सराव केला. आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, कर्णधार स्टीव्ह स्मिथ, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि उस्मान ख्वाजा यांच्यासह इतर मुख्य खेळाडूंनी नेटमध्ये घाम गाळला. फलंदाजांनी खेळपट्टीवर धावण्याचा सरावदेखील केला. तसेच, काही खेळाडूंनी स्लिपमध्ये झेल घेण्यावर अधिक भर दिला.
भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी मारा भेदक ठरण्याची पुरेपूर जाणीव असल्याने आॅस्टे्रलियन फलंदाजांनी फिरकीविरुद्ध खेळण्याचा पुरेपूर सराव केला. या वेळी संघाचे फिरकी सल्लागार श्रीराम श्रीधरन यांनी काही स्थानिक फिरकीपटूंसह संघातील काही फिरकी गोलंदाजांना मारा करण्यास सांगितले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, गेल्या १९ कसोटींमध्ये त्याचा संघ अपराजित आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीयांचा अश्वमेध रोखण्यासाठी आॅस्टे्रलियाचा संघ कोणतीही कसर सोडणार नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
कोहलीला स्टार्कचे कडवे आव्हान : हसी
नवी दिल्ली : मिशेल स्टार्क हा स्वत:मधील वैशिष्ट्याच्या बळावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली याला कडवे आव्हान सादर करेल, असे मत माजी दिग्गज फलंदाज मायकेल हसी याने व्यक्त केले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना हसी म्हणाला, ‘स्टार्क नवा चेंडू अधिक स्विंग करतो. भारतीय उपखंडात कसे चेंडू टाकायचे, याची त्याला माहिती आहे. मालिकेत कोहलीला तो आव्हान देईल. कोहली जबर फॉर्ममध्ये असल्याने त्याला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.’
कोहलीप्रमाणे डेव्हिड वॉर्नर हादेखील शानदार फॉर्ममध्ये आहे. या दोघांवर संघासाठी मोठी खेळण्याचे नेहमीच दडपण असते. चांगली बाब ही की, दोघांना धावांची भूक असून, दोघेही फलंदाजीचा आनंद घेण्याप्रती समर्पित आहेत. वेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर वॉर्नर आणि स्मिथ यशस्वी होतील, असा विश्वास हसीने व्यक्त केला.
आॅस्ट्रेलियाच्या तयारीवर आनंदी असलेल्या हसीला भारताविरुद्ध संघ कसा खेळतो, याची उत्सुकता आहे. हसी म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांत भारतीय दौऱ्यावर आॅस्ट्रेलियाने गंभीरपणे लक्ष केंद्रित केले. त्यादृष्टीने आगामी दौऱ्याची तयारीदेखील झाली. पुण्यात पहिल्या कसोटीपूर्वी आमच्या संघाला केवळ एकच सराव सामना खेळायचा आहे. चांगल्या तयारीसाठी अधिक सराव सामने व्हावेत, असे माझे स्पष्ट मत आहे.’
आश्विन आणि जडेजा यांच्या फिरकीला सामोरे जाताना आमच्या फलंदाजांनी स्पष्ट धोरण आखावे. क्रीझवर काय डावपेच असतील हे डोक्यात ठेवावे. आश्विन स्थानिक परिस्थितीत कुणावरही वरचढ ठरतो. जडेजाचेही असेच आहे. या दोघांना तोंड देताना आमचे खेळाडू कसे खेळतात, यावर मालिकेचे भविष्य ठरणार असल्याचे हसीला वाटते.
(वृत्तसंस्था)
कोहलीच्या तंत्रातील चुका शोधा : मॅक्सवेल
आगामी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीवर वर्चस्व मिळवायचे असेल, तर त्याच्या खेळाच्या तंत्रामध्ये चुका शोधून कोहलीला संभ्रमात पाडा, असा सल्ला आॅस्टे्रलियाचा धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या खेळाडूंना दिला.
सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीमुळे आॅस्टे्रलियन संघ ‘विराट’ चिंतेत आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीमध्ये द्विशतक झळकावून त्याने सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज म्हणून मान मिळवला. यामुळेच, २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कांगारुंनी कोहलीविरुद्ध विशेष रणनिती आखण्यास सुरू केली आहे. मॅक्सवेलच्या मते, कोहली सध्या कारकिर्दीतील सर्वोच्च फॉर्ममध्ये आहे.
आणि धावबाद किंवा इतर माफक चुकांद्वारे त्याचा आत्मविश्वास कमी करण्यात मदत होईल, अशीही त्याला अपेक्षा आहे. ‘मला कोहलीच्या खेळामध्ये विशेष तंत्र किंवा इतर गोष्टी असल्याचे वाटत नाही. तो सध्या त्याच्या कारकिर्दीत सर्वोच्च स्थानी आहे, हेच माझे मत आहे,’ असे मॅक्सवेल म्हणाला.
मॅक्सवेल पुढे म्हणाला, की ‘कोहली बाद होण्याकरीता केवळ एका ‘बॅड लक’ची आवश्यकता आहे. धावबाद किंवा यासारख्या माफक चुका कोहलीकडून झाल्यास त्याचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल आणि यासाठी आमच्या खेळाडूंनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे मालिकेतील पहिल्या कसोटीमध्ये कोहलीला चुका करण्यासाठी भाग पाडण्यात आम्ही यशस्वी ठरू हीच अपेक्षा आहे.’