कांगारूंचं शेपूट वाकडंच - द्वारकानाथ संझगिरी
By admin | Published: March 10, 2017 03:08 PM2017-03-10T15:08:55+5:302017-03-10T15:28:23+5:30
आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूने मैदानावर खोडसाळपणा करणं, जीभ सैल सोडणं, थोडक्यात मवालीगिरी करणं ही ब्रेकिंग न्यूज नाही.
- द्वारकानाथ संझगिरी
आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूने मैदानावर खोडसाळपणा करणं, जीभ सैल सोडणं, थोडक्यात मवालीगिरी करणं ही ब्रेकिंग न्यूज नाही. त्यामुळे डी.आर.एस.च्या बाबतीत कर्णधार स्मिथने जे केलं ते अनपेक्षित नव्हतं. दिवसाढवळ्या केलेली चोरी पकडली गेली हे त्यातलं महत्त्वाचं! मला वाटत नाही की, स्मिथ पहिल्या कसोटीपासून चोरी करतोय. बंगळूर कसोटीत दुसऱ्या डावात खेळपट्टी इतके कठीण प्रश्न विचारत होती की, त्यांनी दौऱ्यावर येण्यापूर्वी केलेला जबरदस्त अभ्यास कमी पडला. चौथ्या डावातला पाठलागाचा ताण त्या खेळपट्टीवर त्यांना प्रचंड जाणवला. त्यात डी.आर.एस.च्या मागणीतली अचूकता त्या डावात चुकली. वॉर्नरने घेतलेला डी.आर.एस. उलटला त्यामुळे मार्शच्या वेळी घेता आला नाही आणि मार्शची विकेट नाहक गेली. स्मिथ हा त्यांचा सर्वच बाबतीत सेनापती सदाशिवराव भाऊ! त्याला कळेना काय करावं. त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहिले आणि खिशात हात घालतानाच चोर मुद्देमालासकट पंचांनी आणि विराटनं पकडला.
आणि आता पुन्हा एकदा ही मालिका स्फोटक ठरण्याची चिन्हे दिसायला लागली. त्यात दोन्ही संघ आता एकाच स्तरावर आहेत आणि खेळपट्ट्या जर पुणे आणि बंगळूरच्याच कुटुंबातल्या असतील तर ठिणग्या उडणारच. गेम्समनशिपच्या गोंडस नावाखाली मैदानावरची शेरेबाजी, शिवीगाळ, पाणउतारा करणे वगैरे गोष्टींची आॅस्ट्रेलिया ही कदाचित जननी असावी आणि सर्वांत मोठी मवाली. इयान बॉथम बॅटिंगला आल्यावर यष्टिरक्षक रॉर्डनी मार्शने त्याला मागून विचारणं, ‘तुझी बायको आणि तिला माझ्यापासून झालेली मुलं कशी आहेत?’ ही संस्कृती त्यांचीच. अर्थात इतर देश मग प्रत्युत्तरात पारंगत झाली. मग बॉथमही त्याला उत्तर देऊ लागला, ‘बायको ठीक आहे, पण मुलं तुझ्यासारखी मानसिक पेशंट आहेत’. हवा प्रत्युत्तरात गोरे झिम्बाब्वेचे खेळाडूही निष्णात झाले. मला चटकन नाव आठवत नाही, पण एका झिम्बाब्वेच्या जाड्या फलंदाजाला वारंवार बीट केल्यावर त्याला मॅग्रोने विचारलं, ‘तू इतका जाडा कसा?’ त्याला त्या फलंदाजाने सांगितले, ‘तुझ्या बायकोबरोबर मजा केल्यावर ती प्रत्येकवेळी मला एक बिस्कीट देते’. आशियायी खेळाडू एकेकाळी या आॅस्ट्रेलियन खेळाडूंना थोडे दबून राहात होते, पण प्रत्युत्तराची सुरुवात भारतात सुनील गावसकरने केली. टॉनी ग्रेगने सुनावलं, तुझी छाती केवढी आहे, त्यावेळी ड्रेसिंगरूममध्ये ये दाखवतो. हे सुनीलचं प्रत्युत्तरही भारतीय आक्रमकतेची सुरुवात होती. त्याच्यापुढे दहा पावलं थेट आॅस्ट्रेलियात श्रीलंकेचा रणतुंगा गेला. त्याला मुरलीधनरला थ्रो दिल्याचं निमित्त मिळालं. सौरभ गांगुली कर्णधार झाल्यानंतर जवळजवळ प्रत्येक भारतीय खेळाडू आक्रमक बनला. समोरच्या क्रिकेटपटूच्या कर्तृत्वाचा किंवा लौकिकाचा दबाव आता भारतीय खेळाडूवर पडत नाही. उलट, ‘चल ए हट, चिरकूट साला, ही वृत्ती असते. एकदा स्टीव्ह वॉ फलंदाजीला आल्यावर ‘कमॉन बॉईज, आॅस्ट्रेलियन टेल हॅज बिगन, असं खुद्द गांगुली म्हणाला. २००१ ची ही गोष्ट. त्यानंतर २००२ मध्ये गांगुलीने तो शर्ट लॉर्डस्वर फिरवला. मग हरभजन- सायमंडस् प्रकरण घडले. आता विराट कोहली तर गांगुली परंपरेतला आहे. त्यामुळे त्याच्याकडून सौजन्याची अपेक्षा करणं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंकडून सानेगुरुजी टाईप भाषणाची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे.
त्यामुळे पुढच्या दोन कसोटीत धमाल पहायला मिळू शकते. बॅट आणि बॉलची आणि जीभ नावाच्या तलवारीची आॅस्ट्रेलियन्स धड बदलत नाहीत. एकदा इयान चॅपेलला सर डॉन ब्रॅडमनने कसोटीतून वगळलं. पुन्हा चॅपेलला संधी मिळाल्यावर त्याने शतक ठोकलं आणि मग बॅट उंचवायच्या ऐवजी ब्रॅडमन जिथे बसले होते तिकडे तोंड केलं पॅन्टची चेन उघडली, अश्लील हावभाव केले. चेन बंद केली आणि पुन्हा बॅटिंग सुरू केली. ब्रॅडमनने त्याला पुन्हा वगळलं. आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या संस्कृतीचं शेपूट हे वाकडंच असतं. जे स्वत:च्या क्रिकेटच्या देवाला मान देत नाहीत. इतरांना काय देणार? त्यांच्याशी असंच वागलं पाहिजे, ठोशाला ठोसा !
(लेखक क्रीडा समीक्षक आहेत.)