कौन बनेगा ‘नंबर वन’?, आश्विन, जडेजामध्ये होणार झुंज
By Admin | Published: February 8, 2017 12:42 AM2017-02-08T00:42:46+5:302017-02-08T00:42:46+5:30
आगामी ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले
दुबई : आगामी ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले असतानाच, दुसरीकडे मात्र भारतीय संघातील दोन प्रमुख फिरकी गोलंदाज ‘नंबर वन’ ठरण्यासाठी एकमेकांविरुद्ध झुंजतील. सध्या आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दोन स्थानी असलेल्या रविचंद्रन आश्विन
आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सध्या आश्विन अव्वल स्थानी विराजमान असून, त्याखालोखाल जडेजा द्वितीय क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आश्विन आणि जडेजा यांच्यामध्ये केवळ ८ गुणांचे अंतर असल्याने जडेजाला अव्वल स्थान काबीज करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशाविरुद्ध दबदबा राखून आपले अव्वल स्थान आणखी भक्कम करण्यास आश्विन उत्सुक असेल. यामुळेच या दोन स्टार गोलंदाजांच्या लढाईमध्ये कोण कोणाची ‘फिरकी’ घेणार, याबाबत क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.
गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात इंदूरमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३२१ धावांनी विजय मिळविल्यापासून आश्विन मानांकनामध्ये अव्वल स्थानावर आहे. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धही चमकदार कामगिरी करताना आपले अव्वल स्थान कायम राखले. मात्र, याच दौऱ्यात जडेजाने सातत्यपूर्ण कामगिरी करून क्रमवारीमध्ये मोठी झेप घेऊन द्वितीय स्थान पटकावले. यामुळे एक वेळ कोणाचीही स्पर्धा नसलेल्या आश्विनपुढे आपल्याच संघातील जडेजाचे नवे आव्हान उभे राहिले.
सर्व काही एका गुणासाठी
संघांच्या क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानावर असून, बांगलादेश नवव्या स्थानी आहे. जर या सामन्यात बांगलादेशाने विजय मिळविला, तर त्यांना ५ मानांकन गुणांचा लाभ होईल.
भारताला दोन मानांकन गुणांचे नुकसान सहन करावे लागेल. त्याच वेळी भारताने विजय मिळविल्यास यजमानांना एका मानांकन गुणाचा लाभ होईल, तर बांगलादेशाचा एक मानांकन गुण कमी होईल.
भारत-बांगलादेश कसोटी सामन्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्या संघाचा शाकीब अल्-हसन हा तिसरा सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज आहे. आयसीसी क्रमवारीत तो १४व्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे, भारताचा ईशांत शर्मा (२३), बांगलादेशाचा मेहदी हसन (३६), भारताचा उमेश यादव (३७) आणि बांगलादेशाचा ताजुल इस्लाम (३९) यांनाही आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे.
‘विराट’ सुधारणा करायची आहे
फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या तुलनेत ५८ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. या एकमेव सामन्यातून हे अंतर कमी करण्याची कोहलीला संधी असेल. त्याचप्रमाणे, चेतेश्वर पुजारा (१२), अजिंक्य रहाणे (१५), शाकीब (२२),
मुरली विजय (२७), तमीम
इक्बाल (२८) आणि मोमीनुल
हक (२९) यांनाही आपल्या मानांकनातील स्थान सुधारण्याची संधी आहे.