केदार जाधवच्या शतकी खेळीने भारत अजिंक्य

By admin | Published: July 15, 2015 01:15 AM2015-07-15T01:15:35+5:302015-07-16T08:46:32+5:30

केदार जाधवचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक तसेच मनीष पांडेच्या पदार्पणातील ७१ धावांच्या बळावर भारताने मंगळवारी झिम्बाब्वेचा तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेमध्ये

Kedar Jadhav's century helped India win | केदार जाधवच्या शतकी खेळीने भारत अजिंक्य

केदार जाधवच्या शतकी खेळीने भारत अजिंक्य

Next

हरारे : केदार जाधवचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक तसेच मनीष पांडेच्या पदार्पणातील ७१ धावांच्या बळावर भारताने मंगळवारी झिम्बाब्वेचा तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेमध्ये ८३ धावांनी पराभव करीत मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केले.
भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावा नोंदविल्यानंतर झिम्बाब्वेला ४२.४ षटकांत १९३ धावांत रोखले व सामना सहज जिंकला. पराभूत संघाकडून चामू चिभाभा याने सर्वाधिक ८२ धावांचा एकाकी संघर्ष केला; पण दुसऱ्या टोकाहून त्याला साथ मिळू शकली नाही. या मालिकेत सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चिभाभाने १०९ चेंडूंचा सामना करीत सात चौकार मारले. झिम्बाब्वेची गळती सहाव्या षटकापासूनच सुरू झाली. हॅमिल्टन मस्कद्जा ७ हा मोहीतच्या चेंडूवर पायचित झाल्यानंतर चिभाभा-चकाब्वा (२७) यांनी ७० धावांची भागीदारी केली. कर्णधार एल्टन चिगुंबुरा याला मुरली विजयने बाद केले. यष्टिरक्षक रिचमंड मुतुबामी (२२) बाद होताच झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा मावळल्या. बिन्नीने ५५ धावा देत तीन आणि मोहीत शर्मा, अक्षर पटेल व हरभजनसिंग यांनी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून झिम्बाब्वे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केदार जाधवच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट (१०५ धावा) खेळीच्या बळावर भारताने आघाडीच्या फळीच्या अपयशानंतरही पाच गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावा उभारल्या. जाधवने मनीष पांडेसोबत (७१) पाचव्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी केली. भारताची एक वेळ चार बाद ८२ अशी घसरगुंडी झाली होती; पण दोघांनी धावसंख्येला आकार दिला. स्टुअर्ट बिन्नी (१८) याने जाधवसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पांडेने ८६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ७१ धावा केल्या, तर जाधवने ८७ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह १०५ धावा ठोकल्या. रॉबिन उथप्पानेदेखील ३१ धावांचे योगदान दिले. सुरुवात मात्र खराब झाली. अजिंक्य रहाणे १५, मुरली विजय १३ हे झटपट बाद
झाले. नेव्हिले मेदजिवा याने दोघांना बाद केले. चामू चिभाभा, हॅमिल्टन मस्कद्जा व प्रॉस्पर उत्सेया यांनी एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)

पांडे २०६ वा खेळाडू!
मनीष पांडे हा वन डे पदार्पण करणारा भारताचा २०६ वा खेळाडू ठरला. २५ वर्षांचा मनीष कृष्णानंद पांडे याचा जन्म उत्तराखंडमधील नैनितालचा. कर्नाटककडून तो रणजी सामने खेळतो. झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने पदार्पण करीत ७१ धावा ठोकल्या. १९ वर्षांच्या वयात त्याने आयपीएलचा पहिला भारतीय शतकवीर होण्याचा मान मिळविला होता.

धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे झे. उत्सेया गो.
मेदजिवा १५, मुरली विजय झे. मुतुंबामी गो,
मेदजिवा १३, रॉबिन उथप्पा झे. चिगुंबुरा गो.
मस्कद्जा ३१, मनोज तिवारी झे. आणि गो.
उत्सेया १०, मनीष पांडे झे. रझा गो. चिभाभा
७१, केदार जाधव नाबाद १०५, स्टुअर्ट बिन्नी
नाबाद १८, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत
५ बाद २७६ धावा. गोलंदाजी : त्रिपानो
८-०-४६-०, मेदजिवा ९-०-५९-२, चिभाभा
८-०-५५-१, मस्कद्जा १०-०-३१-१, उत्सेया
१०-०-४१-१, क्रेमर ५-०-४२-०.
झिम्बाब्वे : मस्कद्जा पायचित गो. शर्मा ७, चिभाभा झे. जाधव गो. बिन्नी ८२, आर. चकाब्वा त्रि. गो. पटेल २७, चिगुंबुरा पायचित गो. विजय १०, मुतुबामी पायचित गो. बिन्नी २२, सिकंदर रझा त्रि. गो. हरभजन १३, एम. वालेर झे. रहाणे गो. बिन्नी ५, क्रेमर झे. रहाणे गो. हरभजन ००, उत्सेया झे. उथप्पा गो. शर्मा ००, त्रिपानो नाबाद १३, मेदजिवा यष्टिचित गो. पटेल ३, अवांतर : ११, एकूण :४२.४ षटकांत सर्वबाद १९३ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर ६-१-१२-०, मोहित शर्मा ७-०-३३-२, बिन्नी १०-१-५५-३, हरभजन १०-०-३५-२, पटेल ६.४-०-३९-२, विजय ३-०-१९-१.

Web Title: Kedar Jadhav's century helped India win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.