केदारची कामगिरी आश्चर्यचकित करणारी
By admin | Published: June 17, 2017 02:42 AM2017-06-17T02:42:55+5:302017-06-17T02:42:55+5:30
उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या
- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या टप्प्यात भारताला वर्चस्व मिळवून दिले. त्याने महत्त्वाचे बळी घेत बांगलादेश संघ ३१० किंवा ३२० धावांची मजल मारणार नाही, हे निश्चित केले. डावाच्या मधल्या षटकांत कुठल्याही गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाचे बळी घेण्यासारखे दुसरे चांगले काम नाही, पण यामुळे भारताच्या पाचव्या गोलंदाजाबाबत मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे.
भुवनेश्वरने सुरुवातीला बळी घेतल्यानंतर आणि त्याने व बुमराहने एजबेस्टनच्या पाटा खेळपट्टीवर शिस्तबद्ध मारा केला. त्यानंतर तमिम इक्बाल व मुशीफिकूर रहीम यांनी डाव सावरला. विराटने केदारकडे चेंडू सोपविण्याचा जुगार खेळला आणि त्यात त्याला यशही मिळाले. केदार २८ व्या षटकात गोलंदाजीला आला. त्याने सलग सहा षटके टाकताना २२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. २८ ते ४० षटकांदरम्यान बांगलादेशला केवळ ५५ धावा वसूल करता आल्या आणि त्यासाठी त्यांना तीन गड्यांचे मोल द्यावे लागले. त्यामुळे तळाच्या फलंदाजांसाठी सध्याच्या स्थितीत डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टमध्ये गणल्या जाणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध धावा फटकावणे कठीण बाब होती.
केदार चाणाक्ष गोलंदाज आहे. कमी उंची लाभलेला केदार राऊंड आर्म शैलीने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याचे चेंडू फलंदाजाच्या रोखाने येतात. त्याच्या चेंडूचा टप्पा फुललेंथही नसतो आणि आखूडही नसतो. त्यामुळे चेंडूच्या खोलात जाऊन फटका खेळणे किंवा बॅकफूटवर कटचा फटका मारण्याची संधी नसते. त्यामुळे त्याचे एकापाठोपाठ एक निर्धाव चेंडू पडत असतात. यापूर्वी, न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याने गोलंदाजीमध्ये छाप सोडली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीवर लगाम घालण्यासाठी २५ ते ४० व्या षटकांदरम्यान बळी घेणे आवश्यक असते. भारतीय संघाला हार्दिक पांड्याकडून गोलंदाजीमध्ये आशा आहे. कारण माझ्या मते सध्याच्या घडीला भारतीय संघात पाचवा गोलंदाज हीच एकमेव कमकुवत बाजू आहे. हा अपवाद वगळता गुरुवारी भारतीय संघाची खेळी शानदार ठरली. शिखर धवनचा फॉर्म संघाच्या यशात महत्त्वाचा आहे. रोहितचे योगदानही उल्लेखनीय ठरत आहे. विराटचे कव्हर ड्राईव्हचे फटके डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्याची आतापर्यंतची या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी होती. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी आणखी काही राखून ठेवलेले असेल, अशी आशा आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान अंतिम लढत होणे म्हणजे या रंगतदार स्पर्धेची यशस्वी सांगता होण्यासारखे आहे. (गेमप्लॉन)