पुढील वर्ल्डकपपर्यंत सध्याचा संघ कायम ठेवावा
By admin | Published: April 2, 2015 01:33 AM2015-04-02T01:33:22+5:302015-04-02T01:33:22+5:30
वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.
कोलकाता : वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.
वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आॅस्ट्रेलियाकडून उपांत्य फेरीत पराभूत झाला; परंतु त्याआधी महेंद्रसिंह धोनी अँड कंपनीने सर्वच्या सर्व सामने दिमाखात जिंकले होते.
गायकवाड म्हणाले, ‘‘विद्यमान संघातील खेळाडूंनाच कायम ठेवायला हवे. हे खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करतील. हा संघ मोठ्या कालखंडापर्यंत टिकणारा आहे. आमच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. आवश्यकता फक्त अनुभवाची आहे आणि हा अनुभव वेळेबरोबरच मिळत जाईल.’’
परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी खराब फटके खेळले. मी गोलंदाजांना दोष देणार नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आणि सात सामन्यांत ७० विकेट घेणे कोणत्याही संघाला जमले नाही. स्पर्धेआधी आमची गोलंदाजी दुबळी मानली जात होती; परंतु त्यांनी जबरदस्त कामगिरी केली.’’
धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चेनंतरही गायकवाड यांच्यानुसार धोनीच वनडे संघाचा कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. ते म्हणाले, ‘‘खराब निकालानंतरही अशा चर्चा होतात; परंतु धोनीपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. त्याच्यापेक्षा चांगला कर्णधार कोठून आणणार? त्याचा फिटनेस कमालीचा आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे; तोपर्यंत तो खेळायला हवा.’’
गायकवाड यांनी आता फोकस हा वेगवान खेळपट्टी तयार करण्यावर असायला हवा. ते म्हणाले, ‘‘इंग्लंडमधील खेळपट्ट्या लक्षात घेता आता फोकस तशाच खेळपट्ट्या तयार करण्यावर असावा.’’ (वृत्तसंस्था)