केन विलियम्सन तिन्ही प्रकारांत अव्वल पाचमध्ये
By Admin | Published: January 10, 2017 01:46 AM2017-01-10T01:46:10+5:302017-01-10T01:46:10+5:30
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन
दुबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर आयसीसी मानांकनात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळविणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर विलियम्सनने अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत बांगलादेशचा ३-० ने सफाया केला. विलियम्सनने नाबाद ७३, १२ व ६० धावांची खेळी केली. मालिकेत त्याने एकूण १४५ धावा फटकाविल्या. या चमकदार कामगिरीचा त्याला मानांकनामध्ये लाभ झाला. त्याने दोन स्थानांनी प्रगती करताना चौथे स्थान पटकाविले. विलियम्सनने कसोटी व वन-डे मानांकनामध्ये यापूर्वीच अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले आहे. तो कसोटीमध्ये चौथ्या, तर वन-डेमध्ये पाचव्या स्थानी आहे.
विलियम्सन व्यतिरिक्त कोलिन मुन्रोने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती केली आहे. त्याने दुसऱ्या लढतीत ५४ चेंडूंना सामोरे जाताना १०१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने १९ वे स्थान पटकाविले.
टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत आयसीसी एमर्जिंग ‘क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्काराचा मानकरी बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमानने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १०व्या स्थानी दाखल झाला आहे. तो बांगलादेशचा सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू ठरला आहे.
त्याने शाकिब अल-हसनला पिछाडीवर सोडले आहे. शाकिबने तीन स्थानांची प्रगती केली असून तो ११ व्या स्थानी आहे.
दरम्यान, न्यूझीलंडने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध ३-० ने विजय मिळवल्यामुळे त्यांना एका मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. त्यांच्या खात्यावर १२९ मानांकन गुणांची नोंद आहे. भारत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशला एका मानांकन गुणाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या खात्यावर ७२ मानांकन गुणांची नोंद आहे. (वृत्तसंस्था)
यापूर्वी, जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये समावेश असलेला कोहली एकमेव फलंदाज होता. कोहली टी-२० मध्ये अव्वल स्थानी असून, वन-डे व कसोटीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
विशेष बाब म्हणजे, कोहली व विलियम्सन या दोघांनी मलेशियात २००८ मध्ये आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते. भारताने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १२ धावांनी पराभव करीत जेतेपद पटकाविले होते.