केनची विक्रमी खेळी

By admin | Published: October 21, 2016 01:12 AM2016-10-21T01:12:34+5:302016-10-21T01:12:34+5:30

केन विलियम्सनची न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवण्याची संधी केवळ तीन धावांनी हुकली असली, तरी तो कर्णधार म्हणून ग्लेन

Ken's record-breaking innings | केनची विक्रमी खेळी

केनची विक्रमी खेळी

Next

नवी दिल्ली : केन विलियम्सनची न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवण्याची संधी केवळ तीन धावांनी हुकली असली, तरी तो कर्णधार म्हणून ग्लेन टर्नरचा ४१ वर्षे जुना विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.
विलियम्सनने ११८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध ही दुसरी वैयक्तिक सर्वोच्च खेळी ठरली. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नॅथन अ‍ॅस्टलच्या नावावर आहे. त्याने नोव्हेंबर १९९९ मध्ये राजकोट येथे १२० धावांची खेळी केली होती. विलियम्सन भारताविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा किवी कर्णधार ठरला आहे. त्याने टर्नरचा १४ जून १९७५ रोडी मॅन्चेस्टर येथे केलेल्या ११४ धावांच्या खेळीचा विक्रम मोडला.
न्यूझीलंडतर्फे विद्यमान मालिकेत प्रथमच एखादा फलंदाज तिहेरी धावसंख्या नोंदवण्यात यशस्वी ठरला. विलियम्सची वन-डे क्रिकेटमधील आठवी शतकी खेळी आहे. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विलियम्सन स्टिफन फ्लेमिंगसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. अ‍ॅस्टलने न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक १६ शतके झळकावली आहेत. विलियम्सनने आज झळकावलेले शतक न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध किवी फलंजाने झळकावलेले एकूण १७ वे शतक आहे.
विलियम्सनने कसोटी कारकिर्दीची सुरुवात भारताविरुद्ध केली होती आणि अहमदाबादमध्ये नोव्हेंबर २०१० मध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत त्याने पहिल्या डावात १३१ धावांची खेळी केली होती. पण, भारताविरुद्ध वन-डेमध्ये त्याला पहिले शतक झळकावण्यासाठी सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत तो १२ सामने खेळला. २०१४ मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने प्रत्येक लढतीत अर्धशतकी खेळी केली होती. त्यात वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या ८८ धावांच्या खेळीचा समावेश आहे. यापूर्वी भारताविरुद्ध ही त्याची सर्वोच्च खेळी होती. गेल्या काही दिवसांपासून विलियम्सन वन-डेमध्ये शतक झळकावण्यासाठी संघर्ष करीत होता. त्याने १६ सामन्यांनंतर प्रथमच शतक झळकावले. दरम्यान, या कालावधीत तो तीनदा ‘नर्व्हस नाइंटिज’चा बळी ठरला. (वृत्तसंस्था)

Web Title: Ken's record-breaking innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.