खोडा, परांजपेंना पद सोडावे लागणार
By admin | Published: January 4, 2017 03:20 AM2017-01-04T03:20:31+5:302017-01-04T03:20:31+5:30
सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्यांच्या संख्येमध्ये कपात होणार असल्याचे निश्चित आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्यांच्या संख्येमध्ये कपात होणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे गगन खोडा आणि जतीन परांजपे यांना आपले पद सोडावे लागणार आहे. कारण ते निकषांची पूर्तता करीत नाहीत.
लोढा समितीच्या शिफारशीनुसार सिनिअर निवड समिती तीन सदस्यांची असायला हवी. त्यात सर्व कसोटीपटूंचा समावेश असणे आवश्यक आहे. बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये निवड समितीची घोषणा केली त्यावेळी निलंबित अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांनी लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले होते. कारण सर्वोच्च न्यायालयाने तोपर्यंत आपला अंतिम निर्णय दिलेला नव्हता. नव्या समितीचा कुठलाही अधिकृत करार झालेला नव्हता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वन-डे व टी-२० मालिकेसाठी एमएसके प्रसाद, देवांग गांधी आणि शरणजित सिंग संघाची निवड करतील. हे सर्व माजी कसोटीपटू आहेत. संघाची निवड ५ जानेवारी रोजी होईल. लोढा समितीच्या अटींनुसार बीसीसीआयच्या सिनिअर निवड समितीमध्ये केवळ कसोटीपटूंचा समावेश असणे आवश्यक आहे. खोडाने दोन वन-डे तर परांजपेने चार वन-डे खेळल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या समितीने ठरविलेल्या अटींची पूर्तता होत नाही.
बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मते खोडा व परांजपे यांनी आतापर्यंत जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळे त्यांना प्रतिभा समन्वयकाची जबाबदारी मिळू शकते. त्यासाठी कसोटी क्रिकेटपटू असणे आवश्यक नसून, खोडा व परांजपे यामध्ये फिट बसतात. (वृत्तसंस्था)