‘खाशाबांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिवस’, पुरस्काराच्या रकमेतही भरघोस वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:32 AM2023-08-29T09:32:50+5:302023-08-29T09:34:14+5:30
क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत एक लाखावरून तीन लाख आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरून पाच लाख रुपये अशी वाढ करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
पुणे : ‘देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस १५ जानेवारी हा यापुढे राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्यात केली. तसेच क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत एक लाखावरून तीन लाख आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरून पाच लाख रुपये अशी वाढ करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
क्रीडा पुरस्काराच्या रकमेत झालेली वाढ यंदापासून लागू करण्यात आली असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन कोटी ३८ लाखांचा भार पडणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, म्हाळुंगे येथे सोमवारी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
अनेक बॅडमिंटनपटू घडवणारे श्रीकांत लाड, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी ॲथलिट अदिल सुमारीवाला जागतिक स्पर्धेसाठी बुडापेस्ट येथे गेल्याने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांत खेळाडूंना सर्व पातळ्यांवर मदत, साहाय्य केल्याने राज्यातील खेळाडूंची कामगिरी सुधारली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकावेत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खेळाडूंसाठी कितीही पैसे खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. केवळ खेळाडूंनी शानदार कामगिरी करावी.’ राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, ‘लहान मुले स्मार्ट फोनच्या आहारी गेल्यामुळे मैदानांपासून दुरावली आहेत. त्यांना पुन्हा मैदानांकडे घेऊन जाण्याची गरज आहे. तसेच राज्यात देशी खेळांना प्राधान्य देण्याची गरज आहे.’
शिवरायांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार संस्मरणीय आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक सन्मान मिळाले, पण हा पुरस्कार कायम जवळचा वाटेल.
- दिलीप वेंगसरकर,
माजी क्रिकेटपटू
आजपर्यंत घडवलेल्या अनेक खेळाडूंमुळे माझा हा सन्मान झाला. शेवटच्या श्वासापर्यंत शक्य तितक्या खेळाडूंना शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. हा पुरस्कार मोलाचा आहे.
- श्रीकांत लाड,
बॅडमिंटन प्रशिक्षक