Khel Ratna Award: भारताचे 'गोल्डन बॉईज' ठरलेत 'खेलरत्न'चे मानकरी; पाहा या जोडीची अभिमानास्पद कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:12 PM2023-12-20T17:12:45+5:302023-12-20T17:13:42+5:30
Khel Ratna Award : सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना ( Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty ) यंदाचा मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
वर्ल्ड चॅम्पियन्सशीप, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, आशियाई चॅम्पियन्सशीप अशा नावाजलेल्या स्पर्धा गाजवणाऱ्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना ( Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty ) यंदाचा मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पुलेला गोपिचंद ( २०००-२००१), सायना नेहवाल ( २०१०) व पी व्ही सिंधू ( २०१६) यांच्यानंतर खेल रत्न पुरस्कार जिंकणारे हे चौथे बॅटमिंटनपटू आहेत. जागतिक क्रमवारीत नंबर १ क्रमांकावर झेप घेणारी चिराग व सात्विकरसाईराज ही पहिली भारतीय जोडी ठरली होती.
प्रकाश पादुकोण ( १९८०) हे पुरुष एकेरीत आणि सायना नेहवाल ( २०१५) ही महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होते. त्यानंतर किदंबी श्रीकांतने २०१८ मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. मुंबईचा चिराग शेट्टी व आंध्रप्रदेशचा सात्विकसाईराज ही पहिली जोडी ज्यांनी हा पराक्रम केला. या जोडीने २०२२ चे वर्ष गाजवले. त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर यंदा मार्चमध्ये स्वीस ओपन स्पर्धा जिंकली. त्यानंतर आशिया अजिंक्यपद स्पर्धा जिंकून इतिहास रचला. भारताला ५८ वर्षानंतर या स्पर्धेत जेतेपद पटकावता आले. १९६५ साली दिनेश खन्ना यांनी सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकली होती.
चिराग शेट्टी व सात्विकसाईराज यांनी २०२२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि त्याचवर्षी त्यांनी आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदकही नावावर केले. २०२२ च्या आशियाई स्पर्धेत या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पुरुष सांघिक गटात रौप्यपदक नावावर केले. २०२३ मध्ये त्यांनी इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकली आणि सुपर १००० स्पर्धा जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. त्यांनी BWF World Tour जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय जोडीचा मानही पटकावला.
BWF World Tour स्पर्धेत सात्विकने चिरागसोबत ७ जेतेपद पटकावली, तर ३ स्पर्धांमध्ये त्याला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले.