Khel Ratna award : तब्बल अकरा खेळाडू ठरणार ‘खेलरत्न’; नीरज, मिताली, छेत्री यांची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:49 AM2021-10-28T07:49:17+5:302021-10-28T07:49:41+5:30
Khel Ratna award : मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, रौप्य विजेता मल्ल रवी दहिया आणि कांस्य विजेती बॉक्सर लवलीना बोरगोहेन यांच्यासह प्रथमच ११ जणांच्या नावाची बुधवारी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली. खेलरत्नसाठी सहभागी अन्य खेळाडूंमध्ये अनुभवी हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश आणि महिला कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, फुटबॉल संघाचा दिग्गज खेळाडू सुनील छेत्री यांच्या नावाचा समावेश आहे.
मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची कामगिरी विचारात घेण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यास उशीर झाला. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारे अवनी लेखरा आणि मनीष नरवाल, भालाफेकपटू सुमित अंतील आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत तसेच कृष्णा नागर यांना देखील खेलरत्न देण्यात येणार आहे.
समितीने अर्जुन पुरस्कारासाठी एकूण ३५ जणांची नावे जाहीर झाली असून मागच्यावर्षी ही संख्या २७ होती. यंदा शिफारस झालेल्यांमध्ये क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आदींचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
छेत्री ठरणार विशेष
फुटबॉल स्टार आणि भारताचा कर्णधार सुनील छेत्री याचा होणारा सन्मान ऐतिहासिक ठरणार आहे. आता पर्यंत कधीही खेलरत्न पुरस्कारासाठी फुटबॉलपटूची शिफारस झालेली नाही. त्यामुळे छेत्रीचा होणारा गौरव भारतीय फुटबॉलसाठे अत्यंत अभिमानास्पद ठरेल.