खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा आसामवर दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:27 PM2020-01-10T18:27:29+5:302020-01-10T18:27:59+5:30
खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात शुक्रवारी कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश मिळाले.
खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात शुक्रवारी कबड्डीमध्येमहाराष्ट्राला संमिश्र यश मिळाले. मुलांचा १७ वर्षांखालील संघ हरियाणाकडून १६-४४ असा पराभूत झाला. त्याचवेळी युवकांनी म्हणजे २१ वर्षांखालील संघाने यजमान आसामचा ४३-१२ असा धुव्वा उडवून आपली आगेकूच कायम राखली.
महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी चौफेर खेळ करताना एकामागून एक तीन लोण पहिल्या सत्रातच नोंदवून ३२-४ अशा आघाडीसह आपला विजय निश्चित केला होता. मोठी आघाडी आणि दुबळा प्रतिस्पर्धी लक्षात घेऊन महाराष्ट्राने दुस-या सत्रात आपल्या राखीव खेळाडूंना संधी देणे पसंत केले. मात्र, राखीव खेळाडू फारशी छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राला आघाडी आणखी मोठी करता आली नाही. अर्थात, हा विजय महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरला. चढाई, बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. पंकज मोहिते, सौरभ पाटील, अस्लम इनामदार, राजू काथेरे यांच्या खेळाने महाराष्ट्राने एकतर्फी विजय मिळविला.
सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलांना हरियाणाचा सामना करता आला नाही. हरियाणाच्या आक्रमक आणि तुफानी खेळापुढे महाराष्ट्राची मुले निष्प्रभ ठरली. सुरवातीलाच लोण स्विकारावा लागल्यावर बॅकफूटला गेलेली मुले कधीच पुढे आपला खेळ दाखवू शकली नाही. हरियाणाच्या आक्रमक चढायांनी बचाव खिळखिळा झाला, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे प्रमुख अस्त्र असणा-या चढाईपटूंची कोंडी झाली आणि या चक्रव्यूहातून महाराष्ट्राची मुले बाहेर पडू शकली नाहीत.