खेलो इंडिया 2020 : जिम्नॅस्टिक्समध्ये अस्मी व मानसचे पदार्पणातच सोनेरी यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 07:14 PM2020-01-10T19:14:52+5:302020-01-10T19:15:33+5:30

व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुली पराभूत

Khelo India 2019: Maharashtra's Gymnastics Asmi badade and Manas manakavle win gold in debut | खेलो इंडिया 2020 : जिम्नॅस्टिक्समध्ये अस्मी व मानसचे पदार्पणातच सोनेरी यश

खेलो इंडिया 2020 : जिम्नॅस्टिक्समध्ये अस्मी व मानसचे पदार्पणातच सोनेरी यश

Next

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या अस्मी बडदे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवले याने पॉमेल हॉर्स प्रकारात पदार्पणातच सोनेरी कामगिरी करीत स्वप्नवत यश संपादन केले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे व सिद्धी हात्तेकर यांनी रुपेरी यश मिळवित महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व राखले. महाराष्ट्राच्याच मेघ रॉय व सलोनी दादरकर यांनीही ब्राँझपदकावर आपले नाव कोरले.

चुरशीने झालेल्या सर्वसाधारण विभागात १७ वर्षाखालील गटात अस्मीने ४३.८० गुणांची कमाई केली तर श्रेयाला ४०.८० गुण मिळाले. या दोन्ही खेळाडूंनी चेंडू व दोरीच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या. या कसरती करताना त्यांनी उत्तम प्रकारे तोलही सांभाळला. अस्मी ही प्रथमच खेलो इंडिया स्पधेर्साठी पात्र ठरली होती. तिने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण व एक रौप्यपदकाचा मान मिळविला आहे. श्रेयाने गतवर्षी या स्पर्धेसह राष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे.

अस्मी व श्रेया या दोन्ही खेळाडू ठाणे येथे पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. अस्मी ही १४ वर्षीय खेळाडू ठाणे येथील ज्ञानसाधना विद्याामंदिर प्रशालेत शिकत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी पदके मिळविण्याचे तिचे ध्येय आहे. याच क्रीडा प्रकारात आसामच्या उपासा तालुकदारने ३४.२५ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले.

सिद्धी हात्तेकरला रौप्यपदक
महाराष्ट्राच्या सिद्धी हत्तेकरने १७ वर्षांखालील गटात खेळताना आपल्या नावावर आणखी एका पदकाची नोंद केली. तिने टेबल व्हॉल्ट प्रकारात रौप्यपदक मिळविले. पहिल्या दिवशी तिने सर्वसाधारण प्रकारात रौप्यपदक पटकाविले होते. ती औरंगाबाद येथील खेळाडू असूल तिला रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

मानस मनकवलेला सुवर्णपदक
१७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मानस मनकवले याने मुलांच्या पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक जिंकताना स्वप्नवत कामगिरी केली. या प्रकारात त्याने सुरेख लवचिकता दाखविताना अप्रतिम कसरती केल्या. तो ठाणे येथे सरस्वती क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. १४ वर्षीय मानसची ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा आहे. त्याला १०.६५ गुण मिळाले. त्याने यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके मिळविली आहेत. तर, १७ वर्षाखालील गटात मेघ रॉय याने फ्लोअर एक्झरसाईजमध्ये ब्राँझपदक पटकाविले. मुलींच्या असमांतर बार्समध्ये सलोनीला ब्राँझपदक मिळाले. इशिता रेवाळे हिने १७ वर्षाखालील गटातच बॅलन्सिंग बीम प्रकारात ब्रॉंझ पदक जिंकले. 

 

व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुली पराभूत
व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राला २१ वर्षाखालील मुलींच्या गटात पहिलाच पराभव स्विकारावा लागला. केरळने त्यांचा २५-२१, २५-१३, २५-८ असा तीन सेटमध्ये पराभव केला. केरळच्या मुलींनी जोरदार स्मॅशिंग व भक्कम बचाव याचा सुरेख सन्मवय ठेवीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना फारशी संधी दिली नाही. पहिल्या सेटपासूनच केरळने आपला दबदबा निर्माण केला होता. पहिल्या सेटमध्ये महाष्ट्राने त्यांना लढत दिली. तथापी, नंतरच्या दोन सेटमध्ये महाराष्ट्राचा बचाव नि:ष्प्रभ ठरला.

Web Title: Khelo India 2019: Maharashtra's Gymnastics Asmi badade and Manas manakavle win gold in debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.