खेलो इंडिया २०१९ : कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटीलने जिंकले सुवर्णपदक, पहिल्या दिवशी राज्याला कुस्तीत एकूण ५ पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:10 PM2019-01-09T20:10:32+5:302019-01-09T20:43:25+5:30
'खेलो इंडिया २०१९'मध्ये कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटील याने उद्घाटनाच्या दिवशीच धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.
- अमोल मचाले
पुणे - 'खेलो इंडिया २०१९'मध्ये कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटील याने उद्घाटनाच्या दिवशीच धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. कुस्तीत बुधवारी यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण ५ पदकांची कमाई केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. कोल्हापूरच्या प्रवीणने १७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात ५५ किलोखालील वजन गटात बाजी मारली. अटीतटीच्या अंतिम फेरीत त्याने हरियाणाचा मल्ल ललितवर १०-९ने सरशी साधली.
१७ वर्षांखालील मुलांच्या ९२ किलो वजन गटात महाराष्ट्राचा पृथ्वीराज खडके रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्लीच्या नवीन पुनियाविरुद्धची त्याची लढत एकतर्फी ठरली. यात नवीनने पृथ्वीराजचा १२-०ने धुव्वा उडविला. अमृत रेडकर आणि कुंदन या राज्याच्या खेळाडूंनी आपापल्या गटांत कांस्यपदक प्राप्त केले. अमृत हा १७ वर्षांखालील मुलांच्या ६५ किलो वजनगटात तेजवीरकडून ४-८ने पराभूत झाला. २१ वर्षांखालील मुलांच्या ६७ किलो वजनगटात झालेल्या उपांत्य लढतीत मलकित हुडा याने कुंदनवर ६-०ने एकतर्फी विजय मिळवला.
ज्ञानेश्वर देसाईचे सुवर्ण हुकले
१७ वर्षांखालील मुलांच्या ५१ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर देसाई याचे सुवर्ण थोडक्यात हुकले. अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम लढतीत त्याला मणिपूरच्या के. एल. सिंगकडून ३-४ अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या निर्णायक लढतीत ज्ञानेश्वरने प्रतिस्पर्ध्याला चांगलेच झुंजवले. मात्र निर्णायक क्षणी के. एल. सिंग याने सरस खेळ करीत सुवर्ण आपल्या नावे केले अन् ज्ञानेश्वरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.