खेलो इंडिया २०२० : महाराष्ट्राचे जिम्नॅॅस्टिक्स, कबड्डी, व्हॉलीबॉलचे संघ गुवाहाटीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 09:25 PM2020-01-08T21:25:57+5:302020-01-08T21:27:13+5:30
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला वर्चस्वाची संधी ; खेलो इंडिया युथ गेम्स २०२०
पुणे: आसामच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या खेलो इंडिया २०२० युथ गेम्स महोत्सवातील जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या स्पर्धांना आजपासून (दि.९) प्रारंभ होत आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला किमान दोन डझन पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या संघांसह टेबलटेनिस व इतर काही खेळांमधील खेळाडूंचे गुवाहाटी येथे आगमन झाले आहे.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गतवर्षी पुण्यात झालेल्या महोत्सवात जिम्नॅस्टिक्समध्ये मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. यावेळी महाराष्ट्राची मदार प्रामुख्याने रिद्धी व सिद्धी हात्तेकर या भगिनी, अश्विनी बडदे, श्रेया बंगाळे, रिचा चोरडिया, आदिती दांडेकर, अनन्या सोमण, दिव्याक्षी म्हात्रे आदी खेळाडूंवर आहे. गुरुवारी कलात्मक जिम्नॅस्टिक्सला प्रारंभ होईल. रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या स्पर्धा शुक्रवारपासून सुरु होणार आहेत.
कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा महिला संघ यंदा नसला तरीही पुरुष खेळाडूंकडून महाराष्ट्राला विजेतेपदाची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचा कर्णधार पंकज मोहिते याच्यासह सहा खेळाडू प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळलेले आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली तयारी केली आहे. त्यांना अंतिम चार क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याची हुकमी संधी आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरीया, उपसंचालक सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले महाराष्ट्राचे मुख्य पथक प्रमुख आणि पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, मुंबईच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, वाशिमचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिया, औरंगाबादचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे तसेच सर्व संघांचे क्रीडा मार्गदर्शक गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, स्पर्धेच्या अंतिम तयारीस वेग आला आहे. बुधवारी आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी स्वत: येऊन मुख्य स्टेडियमची पाहणी केली. तसेच त्यांनी स्पर्धेच्या संयोजनात महत्वाचा दुवा असलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. मुख्य स्टेडियममध्ये जलतरण व अॅथलेटिक्स या महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पधेर्चे बोधचिन्ह, तसेच स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत.